यूट्यूबवर ‘हिट्स’साठी केलेले ‘नृत्य’ ठरले शिक्षेसाठी ‘फिट’; कोर्टाने जनजागृती करण्याची सुनावली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 02:39 AM2018-09-05T02:39:54+5:302018-09-05T02:40:04+5:30
जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेतून नृत्य करण्याचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून, हिट्स मिळविणाऱ्या तीन उच्च शिक्षित तरुणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या.
मुंबई : जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेतून नृत्य करण्याचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून, हिट्स मिळविणाऱ्या तीन उच्च शिक्षित तरुणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. रामकुमार सुराह, अब्दुल मोहम्मद युसूफ आणि आणि कन्हैय्या कुमार अशी अटक करण्यात आलेल्या या त्रिकुटाची नावे आहेत. रेल्वे कोर्टाने आरोपींना रेल्वे स्थानकांत यासंदर्भात जनजागृती करण्याची शिक्षा सुनावली आहे.
समाज माध्यमांवर अल्पावधीत प्रसिद्ध आणि यू ट्यूबच्या माध्यमाने पैसे मिळविण्यासाठी उच्च शिक्षित तिन्ही आरोपींनी जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेत किकी चॅलेंज केले. या आरोपींना सात दिवस एका समाज माध्यमाच्या मदतीने रेल्वे स्थानकांत जनजागृती करण्याची शिक्षा रेल्वे न्यायालयाने सुनावली आहे.
धारावी येथे राहणारा सुराहने बीएससी आयटीचे आणि अब्दुल व कन्हैय्या या दोघांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक ३ आणि ४ वर २९ जुलैला दुपारच्या सुमारास व्हिडीओ शूट करून यूट्यूबवर अपलोड केला होता. रेल्वे सुरक्षा बलाने अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.
रेल्वे सुरक्षा बलाला, किकी चॅलेंजमधील आरोपी शीव स्थानक परिसरातील धारावी येथे ये-जा करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून तिघांना अटक केली. तिन्ही आरोपींनी चौकशीवेही किकी चॅलेंजनुसार व्हिडीओ शूट करून
तो ३० जुलै रोजी अपलोड करण्यात आल्याचे कबूल केले.
विरार स्थानकावरील किकी चॅलेंजरला शिक्षा
विरार रेल्वे स्थानकावर किकी चॅलेंज पूर्ण करणाºया तरुणांना विरार आरपीएफने यापूर्वीच बेड्या ठोकल्या. या प्रकरणी तिघांना रेल्वे न्यायालयाने वसई स्थानकाची स्वच्छता करण्याची शिक्षा सुनावली होती.