पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून महिलेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 03:37 PM2019-03-13T15:37:19+5:302019-03-13T15:39:08+5:30
तू माझ्यावर वाकड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला ना.. आता मी तुला सोडत नाही, असे म्हणून आरोपीने फिर्यादी महिलेस ब्लॉक फेकून मारला.
पिंपरी : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून महिलेला मारहाण करून तिच्याकडील मंगळसूत्र रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप सुभाष जाधव (वय २५, रा. शुभी मोटर्सच्या बाजूला, वडगाव फाटा, वडगाव, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. काळेवाडीतील एका ४० वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप जाधव यांच्या विरोधात संबंधित महिलेने वाकड पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरून प्रदीप याने २२ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री आठ वाजता पिंपळे सौदागर येथील रोझ व्हॅली सोसायटीत फिर्यादी महिलेस शिवीगाळ केली. तू माझ्यावर वाकड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला ना.. आता मी तुला सोडत नाही, असे म्हणून प्रदीप याने फिर्यादी महिलेस ब्लॉक फेकून मारला. त्यामुळे महिलेच्या गुडघ्याला मार लागून त्या खाली पडल्या. त्यानंतर आरोपीने त्यांच्या पोटावर लाथ मारून गळ्यातील १६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसका मारून जबरदस्तीने तोडून त्याच्या खिशात ठेवले. त्यावेळी महिलेने विरोध केला असता त्यांच्या हातातील पर्स त्यामधील रोख रक्कम ८ हजार रुपये व मोबाईल हिसकावला. एकूण ४१ हजारांचे सोन्याचे दोन मंगळसूत्र, मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेऊन आरोपी प्रदीप जाधव त्याच्या गाडीवर बसून पळून गेला.सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.