घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना लाखोंच्या मुद्देमालासह अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 06:27 PM2022-02-17T18:27:10+5:302022-02-17T18:27:46+5:30
Dhule Crime News : पोलिसांनी आरोपींची अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
धुळे : शहरातील विविध भागातून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चाळीसगाव रोड पोलिसांच्या शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि रोख रकमेसह विविध साहित्य जप्त केली आहे. इम्रान उर्फ इमरान बचत शेख आणि तोसिफ शहा उर्फ फैसल उर्फ सोहेल अरिफ शहा अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. ते सराईत घरफोडी करणारे चोर असून त्यांच्यावर धुळे जिल्ह्यात व नाशिक जिल्ह्यात अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
धुळे शहरात वाढत्या चोरी व इतर गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त घातली जात आहे. तसेच चोरट्यांची माहिती काढली जात आहे, या अनुषंगाने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची तपास करीत असताना घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गुप्त माहितीच्या आधारे अंबिका नगर व जनता सोसायटी भागातून ह्या सराईत घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी आरोपींची अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन, एक पितळी पातेले, एक परात, चांदीचे देवघरातील देव, गॅस सिलेंडर व ३००० रुपये रोख असा एकूण १,८४,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर धुळे जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात देखील अनेक गुन्हे दाखल आहे. यासंदर्भात माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.