बनावट नोटांची घरातूनच छपाई; मुंबईसह राज्यभरात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2022 11:00 AM2022-08-03T11:00:29+5:302022-08-03T11:00:37+5:30

मुख्य सूत्रधारासह चौघांना अटक एक लाख रुपयांच्या बनावट नोटा ३० हजारांत अशा टक्केवारीवर सावज हेरून या नोटा चलनात आणत होता.

Home printing of counterfeit notes; Distribution across the state including Mumbai | बनावट नोटांची घरातूनच छपाई; मुंबईसह राज्यभरात वितरण

बनावट नोटांची घरातूनच छपाई; मुंबईसह राज्यभरात वितरण

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्नाटकमधील एका घरातूनच बनावट नोटांची छपाई करून मुंबईतील दुकानात तसेच बाजारात त्या चलनात आणल्या जात असल्याची धक्कादायक माहिती दादर पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आली आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी कर्नाटक टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात मुख्य सूत्रधारासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून दादरमधील एका बारमध्ये एकजण बनावट नोटांद्वारे मद्य खरेदी करत   असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक  रामकृष्ण सागडे, पोलीस अंमलदार संतोष पाटणे, अजित महाडिक, महेश कोलते, गणेश  माने, राजेंद्र रावराणे आणि आंधळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगूटराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १४ जुलैला परेल एसटी डेपोसमोरून बनावट नोटा बाळगणारा आनंदकुमार रचना ममदापूर (२९) याला ताब्यात घेतले.  त्याच्या घरी छापा टाकताच ४२  हजारांची बनावट रक्कम पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार, गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. 

आनंदकुमार हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून, त्याने या नोटा हुमनाबाद, कर्नाटक येथील शिवकुमार शंकरकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार, पथक कर्नाटकला रवाना झाले. तेथे सापळा रचून शिवकुमारसह किरण अरुण कांबळे (२८) याला ताब्यात घेतले.  त्यांच्याकडून आणखीन २० हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. या दोघांनी दहिसरच्या आकाश तडोलगी याला देखील  १०० व २०० रुपयांच्या  बनावट नोटा दिल्याचे सांगितले. त्यानुसार, त्यालाही दादर पोलिसांनी २६ जुलै रोजी बेड्या ठोकल्या.

नोटासाठी लागणारे साहित्य जप्त
पोलीस चौकशीत किरण कांबळे हा मुख्य सूत्रधार असून, तो कर्नाटकमध्ये राहत्या घरातूनच बनावट नोटांची छपाई करीत होता. मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी त्याने बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती समोर आली. त्याच्या घरातून  बनावट नोटा छपाईसाठी वापरण्यात येणारे एक कलर प्रिंटर, पेपर कटर, साधे कटर, स्टीलची पट्टी, शाईच्या बाटल्या, नोट छपाईसाठी लागणारा कागद, हिरव्या रंगाचा टेप असे साहित्य जप्त केले आहे. 

यूट्युबवरून प्रशिक्षण 
किरण कांबळेने यूट्युबवरून बनावट नोटा बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्या मोबाइलमध्ये सोन्याच्या बिस्किटांसह आणखीन महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. 

टक्केवारीवर बनावट नोटा बाजारात 
कांबळे हा एक लाख रुपयांच्या बनावट नोटा ३० हजारांत अशा टक्केवारीवर सावज हेरून या नोटा चलनात आणत होता. तसेच, दारू विक्री केंद्र तसेच गर्दीच्या ठिकाणी १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणत होता. आतापर्यंत चारही आरोपींकडून ६८,६०० रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
 

Web Title: Home printing of counterfeit notes; Distribution across the state including Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.