चाकण येथे पैसे उकळण्यासाठी होमगार्डचा युवतीला जाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 02:51 PM2018-12-04T14:51:31+5:302018-12-04T15:01:13+5:30
तरूणीच्या मोबाईलमध्ये होमगार्डनी त्यांचे मोबाइल क्रमांक सेव्ह केले. फोन केल्यानंतर प्रतिसाद दे अशी तंबी देऊन दुसऱ्या दिवशी एक होमगार्ड तिला घेऊन लॉजवर गेला.
पिंपरी : भिमाशंकरजवळील अदिवासी पाड्यातून नोकरीच्या निमित्ताने चाकणला आलेल्या एका तरूणीला तिच्या सहकाऱ्याबरोबर दुचाकीवरून जात असताना, होमगार्डने अडविले. दोन होमगार्ड आणि एक कॉन्स्टेबल एकत्र आले. त्यांनी दुचाकी घेऊन थांबलेल्या तरूणाकडे दुचाकीची कागदपत्र मागितली. तसेच पैशांची मागणी केली. पैसे नाहीत, म्हटल्यावर त्यांची आधारकार्ड काढून घेतली. तरूणीच्या मोबाईलमध्ये होमगार्डनी त्यांचे मोबाइल क्रमांक सेव्ह केले. फोन केल्यानंतर प्रतिसाद दे अशी तंबी देऊन दुसऱ्या दिवशी एक होमगार्ड तिला घेऊन लॉजवर गेला. प्रसंगावधान दाखवुन तिने सहकारी मित्राशी संपर्क साधला. तो तातडीने मदतीला धावुन आल्याने पुढील अनर्थ टळला. तरूणीने याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाने चाकण पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अजय भोसले, होमगार्ड सचिन वाघोले, सागर मांडे यांच्याविरूद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. पैसे उकळण्यासाठी धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच विनयभंगाचा गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिघांवर निलंबनाची कारवाई केली. चाकण सहारा सिटी रस्त्यालगत तरुण आणि तरूणी रस्त्याच्या बाजुला दुचाकी घेऊन थांबले असता, एक कॉन्सटेबल, दोन होमगार्ड तेथे आले. तरूण, तरूणीला दमदाटी करून पैसे मागू लागले. पाच हजार रुपए द्या, सोडून देतो, असे म्हणत त्यांनी दोघांची आधारकार्ड काढून घेतली. काहीही चूक केलेली नसताना, पैसे कशासाठी द्यायचे असा मनात विचार आला. खरे तर त्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम नव्हती. या रकमेची काही दिवसात जुळवाजुळव करणेही शक्य नव्हते. होमगार्डने पैसे आणून दे, आधारकार्ड, ओळखपत्र घेऊन जा. अशी त्यांना तंबी दिली. तरूणीचा मोबाईल मागून घेतला. त्यात त्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक सेव्हे केले. दुसºया दिवशी तरूणी राहत असलेल्या पत्यावर ते गेले. तेथे जाऊन तिला मोबाइलवर संपर्क साधला. तु खाली येतेस का, आम्ही वरती येऊ असे धमकावले. तरूणी खाली आल्यानंतर होमगार्डने तिला तोंडाला स्कार्फ लावण्यास सांगितले. स्वत:नेही स्कार्फ लावला. काही अंतर पुढे गेल्यावर हॉटेलात जाऊन तिला नाष्टा दिला. स्वत:ही नास्टा केला. त्यानंतर दुचाकीवरून एका लॉजवर नेले. तेथे तू वर खोलीत जा, मी थोड्या वेळात येतो. असे म्हणुन होमगार्ड खाली थांबला.लॉजवर जाईपर्यंत होमगार्डने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. होमगार्डने लॉजवर जाण्यास सांगितल्यानंतर तरूणीला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. तिने सहकारी मित्राशी संपर्क साधला. त्याला बोलावुन घेतले. तिचा मित्र तातडीने तेथे आला. विनायक जगताप, मनेश कनकुरे यांची मदत घेऊन त्यांनी या प्रकाराबद्दल दाद मागण्याचा निर्णय घेतला. तरूणीला घेऊन ते पोलीस आयुक्त कार्यालयात आले. एक कॉन्स्टेबल आणि दोन होमगार्ड यांच्याविरूद्ध फिर्याद दिली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तातडीने निलंबन करण्यात आले.