‘होमगार्ड’ची ५७ पदे रद्द; आर्थिक मंदीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 07:42 PM2019-08-05T19:42:32+5:302019-08-05T19:50:37+5:30
गेल्या अनेक वर्षापासून ही पदे भरण्यात आलेली नव्हती.
मुंबई - राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याचा पहिला फटका होमगार्ड विभागाला बसला आहे. राज्यभरातील कार्यालयात मंजूर असूनही रिक्त असलेली चतूर्थ श्रेणीतील तब्बल ५७ पदे रद्द करण्यात आली आहेत. वित्त विभागाने काटकसरीबाबत सुचविलेल्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून ही पदे भरण्यात आलेली नव्हती.
राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी पोलिसांना गृहरक्षक दलाकडून सहकार्य केले जाते. मानसेवी तत्वावर कार्यरत असलेल्या होमगार्डच्या कार्यालयात प्रशासकीय कामकाज व मदतीसाठी २००३ साली ड वर्गातील १५७ पदे मंजूर केली होती. त्यामध्ये शिपाई, सफाई कामगार,चौकीदार, क्वाटरगार्ड सैनिक, आचारी, धोबी, माळी आदी पदाचा समावेश होता. मात्र शासनाकडून पुर्ण पदे भरण्यात आलेली नव्हती. तब्बल ५७ पदे रिक्तच होती. अर्थ विभागाने काटकसरीच्या धोरण अवलंबिण्यासाठी एकुण पदापैकी २५ टक्के पदे रद्द करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रिक्त असलेली ही पदे रद्द करण्यात आली आहेत.