घरातच करायचा गांजाची शेती; 'उद्योगी' तरुण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 06:18 AM2019-12-16T06:18:09+5:302019-12-16T15:38:27+5:30
चेंबूरमधील प्रकार : गुन्हे शाखेच्या कक्ष ३ची कारवाई
मुंबई : चेंबूरमध्ये राहत्या घरातच अत्याधुनिक पद्धतीने गांजाचे उत्पादन करत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून १ किलो गांजा आणि ५४ ग्रॅम एमडी हस्तगत करण्यात आला असून त्याच्या मित्राच्या घरातून सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ३ च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे चेंबूर, आरसीएफ, देवनार परिसरात गस्तीवर असताना निखिल शर्मा (२६) हा संशयास्पद हालचाली करताना त्यांना आढळला. त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडून २ लाख ९० हजार किमतीचा एक किलो गांजा आणि ५४ ग्रॅम एमडी आढळले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने मित्राच्या घरातच हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम या अत्याधुनिक पद्धतीने गांजाची लागवड करत उत्पादन केल्याचे समोर आले. त्यानुसार, पथकाने चेंबूरच्या माहुल गावातील पालव बागेत छापा टाकला. तेथे गांजा उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेले तीन हायड्रोपोनिक ग्रो सिमेंटचे टेंट, कुंड्या, एलईडी लाइट, टायमर यंत्रणा, पीएच सॉईल टेस्टर, आर्द्रता मापक, हायड्रोपोनिक न्युट्रियट्स, वेगवेगळ्या जातीच्या गांजाच्या बियांसह, बी उगविण्यासाठी पेपर टॉवेल अशी एकूण ६ लाखांची मालमत्ता गुन्हे शाखेने जप्त केली आहे.
गांजाचे उत्पादन करणारे उच्चशिक्षित...
गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेला निखिल हा बीए पास असून त्याने नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो गेल्या ८ महिन्यांपासून गांजा विक्री करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला. तेव्हा तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. या प्रकरणातील त्याचे अन्य दोन साथीदार पसार आहेत. त्याचा शोध सुरू असून दोघेही उच्चशिक्षित असल्याचे समजते. ते मित्रच उत्पादन करायचे. त्यासाठी लागणारे साहित्य, त्याच्या व्यवहाराची जबाबादरी निखिलवर होती.
इंटरनेटवरून सर्चिंग : आरोपीने वेगवेगळ्या इंटरनेट साइटच्या माध्यमातून गांजा उत्पादनासाठी आवश्यक साहित्य, केमिकल्स, अमली पदार्थ मागविल्याचे समोर आले. इंटरनेटवरूनच त्याला गांजा उत्पादनाबाबत समजले. त्यानुसार, गुन्हे शाखा या प्रकरणी अधिक तपास करत आहे.