समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग, हत्या अन् सूटकेस! पोलिसांनी उलगडली थरारक मर्डर मिस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 03:40 PM2022-02-02T15:40:27+5:302022-02-02T15:40:40+5:30
मेट्रो स्टेशन बाहेर सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं; व्यवसायिकासह तिघांना अटक
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी सरोजिनी नगर मेट्रो स्टेशन परिसरात एक बेवारस मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग आणि हत्या असा थरकाप उडवणारा घटनाक्रम समोर आला. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यवसायिकासह तिघांना अटक केली आहे.
हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं वय २२ वर्ष होतं. तो सेल्समन म्हणून काम करायचा. तो काम करत असलेल्या व्यवसायिकासोबत त्याचे समलैंगिक संबंध होते. त्याचे व्हिडीओ सेल्समननं गुपचूप रेकॉर्ड केले होते. हे व्हिडीओ दाखवून सेल्समननं व्यवसायिकाकडे पैशांची मागणी केली. पैसे दे, अन्यथा व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी त्यानं व्यवसायिकाला दिली.
सेल्समनकडून सतत होत असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या व्यवसायिकानं त्याला संपवण्याचा कट रचला. भाचा आणि एका व्यक्तीच्या मदतीनं त्यानं सेल्समनची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून मेट्रो स्टेशनजवळ फेकला.
२८ जानेवारीला मृतदेह आढळून आल्यानंतर २९ जानेवारीला एसएचओ देवेंद्र कौशिक यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांची एक टीम तयार करण्यात आली. मृत तरुण दक्षिण दिल्लीतील एका व्यवसायिकाकडे सेल्समन म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हत्या झालेल्या दिवशी तरुण व्यवसायिकासोबत दिसल्याची माहिती पोलिसांना शेजारच्या व्यक्तींच्या चौकशीतून समजली. त्याला दुजोरा देणारे सीसीटीव्ही फुटेजही सापडले. हत्येच्या दिवशी व्यवसायिकाच्या मोबाईलचं लोकेशनदेखील सरोजिनी नगर मेट्रो स्टेशनजवळ होतं. पोलिसांनी चौकशी सुरू करताच व्यवसायिकानं उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली.