प्रामाणिकपणा! रिक्षाचालकाने प्रवाशाचे हरवलेले पैसे केले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 16:07 IST2020-02-19T16:03:39+5:302020-02-19T16:07:30+5:30
एकीकडे काही मुजोर रिक्षाचालकांमुळे रिक्षाचालकांची प्रतिमा मलिन होत असताना राममिलन या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रामाणिकपणा! रिक्षाचालकाने प्रवाशाचे हरवलेले पैसे केले परत
कल्याण - कल्याण येथे प्रामाणिक रिक्षाचालकाने एका प्रवाशाचे रिक्षात राहिलेली बॅग आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम परत करून माणुसकी शिल्लक असल्याचे पटवून दिले आहे. राममिलन यादव असे या ४२ वर्षीय प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. प्रवासी अभिषेक साळवी हे आपली २० हजार रोकड व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरले होते. रिक्षाचालक राममिलन यांनी साळवी यांना संपर्क करत सदर बॅग बाजारपेठ पोलीस स्थानकात दिली. एकीकडे काही मुजोर रिक्षाचालकांमुळे रिक्षाचालकांची प्रतिमा मलिन होत असताना राममिलन या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई गिरगाव येथे राहणारे अभिषेक साळवी सोमवारी आपल्या कुटुंबासह कल्याणात आले होते. साळवी कुटुंबासह रिक्षाने प्रवास करीत असताना ते २० हजार रोकड आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरले होते. या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. मात्र, त्यांना रिक्षाचा नंबर माहित नव्हता. मात्र, सदर रिक्षाचालक राममिलन यादव याने प्रामाणिकपणा दाखवत बॅगेत असलेल्या कागदपत्रांच्या आधारे साळवी यांच्याशी संपर्क साधत त्यांनी बॅग व २० हजारांची रोकड बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा केली. धकाधकीच्या जीवनात पैशांची निकड असताना आणि हातावरील प्रपंच असून देखील रिक्षाचालक राममिलन यादव यांनी प्रामाणिकपणे सापडलेली बॅग परत केल्याने पोलीस स्टेशन येथे रिक्षाचालकाचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा खरंच कौतुकास्पद असून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.