अश्लील गाणं गायल्याप्रकरणी हनी सिंगचा कोतवाली ठाण्यात 3 तास होता मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 05:46 PM2022-02-13T17:46:05+5:302022-02-13T20:27:33+5:30
Honey Singh : अश्लील गाणे गायल्या प्रकरणी हनी सिंगवर २०१४ मध्ये नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
नागपूर : रंगबिरंगी प्रकाशझोतात, झगमगत्या मंचावर हजारो श्रोत्यासमोर सादरीकरण करणारा रॅप सिंगर हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनी सिंग याने आज कोतवाली पोलीस ठाण्यातील एका दहा बाय दहाच्या खोलीत व्हाईस सॅम्पलच्या निमित्ताने रॅप सिंगिंग केले. व्यवस्थित आवाज रेकाॅर्ड व्हावा म्हणून पोलिसांनी हनी सिंगकडून तीन तासात अनेकदा टेक रिटेकही घेतले.
अश्लील गाणी गाऊन ती यु ट्यूबवर अपलोड केल्यामुळे यो यो हनी सिंग सध्या अडचणीचा सामना करीत आहे. त्याच्याविरुद्ध स्थानिक व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर करून हनीसिंगविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अंतर्गत एफआयआर नोंदविला होता. या प्रकरणात सत्रन्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी हनीसिंगला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे तो कारागृहाबाहेर आहे. मात्र, न्यायालयाने हनीसिंगला आवाजाचे नमुने देण्याकरिता ४ ते ११ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश दिला होता. हनीसिंगने त्या आदेशाचे पालन केले नाही. दरम्यान, त्याने सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून या आदेशात बदल करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ती फेटाळून लावली. तसेच त्याला १२ फेब्रुवारीला पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश दिला. त्यानुसार, हनीसिंग, त्याचे दिल्लीतील एक वकिल आणि एका मित्रासह शनिवारी रात्री नागपुरात पोहचला. मात्र, रात्र झाल्याने व्हाईस सॅम्पल घेणे शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर, रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास तो कोतवाली ठाण्यात पोहोचला. तेथे महिला पोलीस निरिक्षक प्रभावती एकुर्के, सहायक पोलीस निरीक्षक विशाल माने यांनी हनी सिंगकडून व्हाईस सॅम्पल घेण्यासाठी ‘ती’ गाणी गाऊन घेतली. तब्बल तीन तास टेक रिटेक करीत पंचासमोर सुस्पष्ट नमुने घेतल्यानंतर दुपारी ४.३० वाजता हनी सिंगला पोलिसांनी मोकळे केले.
थँक्यू सर, थँक्यू ब्रो ...
हनी सिंग व्हाईट कलरची टी शर्ट घालून आलिशान व्हाईट कारमधून पोलीस ठाण्यात आला होता. डोक्यावर त्याने नेहमीप्रमाणे उलटी (पुढची मागे) कॅप घातली होती. तीन तास पोलीस ठाण्यात बसल्याने तो घामाघुम झाला होता. आपल्या खास शैलीत थँक्यू सर, थँक्यू ब्रो म्हणत तो पोलीस ठाण्यातून बाहेर पडला.