हनी ट्रॅप प्रकरण : साहिल सय्यदवर पुन्हा एक गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:55 PM2020-07-17T23:55:09+5:302020-07-17T23:57:23+5:30
ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून कोट्यवधींची माया गोळा करणारा गुन्हेगार साहिल सय्यद याच्याविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅप मध्ये फसवून त्यांचा पॉलिटिकल गेम करण्याचे गुन्हेगारी षड्यंत्र रचण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून कोट्यवधींची माया गोळा करणारा गुन्हेगार साहिल सय्यद याच्याविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅप मध्ये फसवून त्यांचा पॉलिटिकल गेम करण्याचे गुन्हेगारी षड्यंत्र रचण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल झाला आहे.
नगरसेवक तिवारी यांनी मंगळवारी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीसोबत पोलिसांकडे साहिल आणि त्याच्या साथीदाराचे गुन्हेगारी कारस्थानाचे संभाषण असलेली ऑडिओ क्लिप पोलिसांकडे देण्यात आली होती. साहिल त्याच्या साथीदाराला महापौर जोशी आणि नगरसेवक तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसवून त्यांचा गेम करण्याचे कटकारस्थान करीत असल्याचे या क्लिपमधून पुढे आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्याआधारे तिवारी यांनी तहसील पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर साहिल याच्याविरुद्ध गुन्हेगारी कटकारस्थान करण्याच्या आरोपाखाली तसेच महिलांच्या बाबतीत अर्वाच्च संभाषण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
तिसरा गुन्हा
साहिलविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. यापूर्वी पाचपावली पोलिसांनी गेल्या आठवड्यात त्याच्याविरुद्ध एका मृत वृद्धेच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून ती मालमत्ता हडपण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तर तत्पूर्वी मानकापूर पोलीस ठाण्यातही एलेक्सिस प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे.
लोकमतचा दणका
या प्रकरणात साहिलच्या दोन्ही वादग्रस्त आॅडिओ क्लिप मधील संभाषण लोकमत'ने प्रकाशित करून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. फरार साहिलचा गुन्हे शाखा, तहसील आणि पाचपावली पोलीस शोध घेत असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या मोठ्या अधिकाऱ्याचे नाव!
बनावट प्रकरण उभे करून खासगी इस्पितळात गोंधळ घालून त्याची व्हिडिओ क्लिप तयार करणाºया आणि खासगी इस्पितळाच्या प्रशासनाला बदनामीचा धाक दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वादग्रस्त साहिल सय्यद याच्या कटकारस्थानात महापालिकेचा एका मोठा अधिकारी सहभागी होता, अशी चर्चा आहे. पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.
अपसंपदा प्रकरणात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण गंटावार यांच्याविरुद्ध एसीबीने कारवाई केल्यानंतर आक्रमक झालेल्या आणि दुसºयाच्या गेमची प्लॅनिंग करणाऱ्या साहिल सय्यदचा त्याच्याच साथीदारांनी गेम केला. त्यांनी त्याच्या दोन आॅडिओ क्लिप व्हायरल केल्या. त्यामुळे उजळ माथ्याने समाजात फिरणाऱ्या साहिल सय्यदची गुन्हेगारी आणि त्याचे कटकारस्थान चर्चेला आले. पोलिसांनी त्या दोन्ही क्लिप्सची चौकशी चालवली आहे. एका क्लिपमध्ये साहिलने हनी ट्रॅपचे कटकारस्थान करण्याचे मनसुबे आपल्या साथीदारांना बोलून दाखवले आहेत. त्याने एका हॉस्पिटलमध्ये असलेल्या कक्षात प्लॅनिंग मीटिंगचेही आयोजन केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ४ जुलैला धंतोली येथील डॉ. प्रवीण गंटावारच्या हॉस्पिटलमध्ये ही बैठक पार पडली. त्यात डॉक्टर गंटावार यांच्या मर्सिडीजमध्ये एक वरिष्ठ अधिकारी आला होता. कारमध्ये बसून त्याने साहिल आणि साथीदारांना दिशानिर्देश दिले. त्यानंतर ५ जुलैला एलेक्सिस हॉस्पिटलला नोटीस देण्यात आली आणि ६ जुलैला कारवाई करण्यात आली. हॉस्पिटल बंद करण्याच्या या कटकारस्थानात साहिलसोबत महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी असल्यामुळेच षड्यंत्र करण्याची मजल त्याने मारली होती, अशी ही आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात.