पाच जिल्ह्यात हनीट्रॅपचे जाळे निर्माण करणारी टोळी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 05:26 AM2021-03-02T05:26:22+5:302021-03-02T05:26:33+5:30
संशयित पुणे जिल्ह्यातील : प्रतिष्ठित लोकांना हेरून केले जात होते ब्लॅकमेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन प्रतिष्ठित लोकांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला. यामध्ये एका महिलेचा समावेश असून, या टोळीने सातारा, पुणे, बारामती, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित लोकांना लुटल्याचे समोर येत आहे.
काजल प्रदीप मुळेकर, अजिंक्य रावसाहेब नाळे, वैभव प्रकाश नाळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांनाही चार दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. सातारा जिल्ह्यातील एका व्यावसायिकाला एक वर्षापूर्वी हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून लुटण्यात आले होते. एका महिलेने मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविला. त्यानंतर व्यावसायिकाला भेटण्यास ही महिला सातारा बसस्थानकात आली. त्यानंतर व्यावसायिकाच्या कारने दोघे ठोसेघर येथे गेले. तेथील एका हॉटेलमध्ये बसले असताना तेथे या महिलेचे भाऊ म्हणून तीन ते चारजण आले. त्यांनी व्यावसायिकाला मारहाण करत त्याच्या गाडीतून साताऱ्यात आणले. तुझे अश्लील व्हिडिओ आमच्याकडे असून, हे प्रकरण मिटविण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. व्यावसायिकाने टोळीला सहा लाखाची रोकड, सोने, चांदी तर दिलीच, पण स्वत:ची आलिशान कारही त्यांना दिली होती. फलटण येथे ही कार बेवारस आढळून आल्यानंतर पोलीस संबंधित व्यावसायिकापर्यंत पोहोचले.
जाळ्यात अडकविण्याची पद्धत होती अशी..
अविनाश नाळे आणि वैभव नाळे हे दोघे प्रतिष्ठित लोक हेरत असत. व्हॅाटसअॅपला डीपी एका सुंदर मुलीचा ठेवत होते. संबंधित लोक या मुलांशी मुलगी म्हणून बोलत असत. अश्लील फोटो पाठवून संबंधिताला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत. गरज भासली तर काजल मुळेकर या युवतीला ते तोंडाला स्कार्फ बांधून व्हिडिओ कॉलिंग करायला लावायचे. अश्लील फोटोची देवाण -घेवाण झाल्यानंतर नाळे बंधू सावजाला लुटण्यास सज्ज होत होते.
साताऱ्यात अजून
तिघे जाळ्यात
हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकलेले सातारा शहरात अजून तिघेजण सापडले आहेत. त्यातील एकाने पोलिसांशी संपर्क साधला आहे. मात्र, त्याची तक्रार देण्याची मानसिक स्थिती नसल्याचे समोर येत आहे.