खळबळ! देशातील निम्म्या लोकसंख्येचा डेटा चोरी; स्विगी, नेटफ्लिक्स ते पॅनकार्ड, कोणालाच सोडले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 10:59 AM2023-04-02T10:59:10+5:302023-04-02T11:00:22+5:30
धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांना शिकविणाऱ्या बायजूस आणि वेदांतू सारख्या कंपन्यांचा देखील यात डेटा आहे.
तेलंगानाच्या सायबराबाद पोलिसांनी देशातील सर्वात मोठा डेटा चोरी करणारे रॅकेट पकडले आहे. या लोकांकडे थोडे थोडके नव्हे तर २४ राज्यांच्या आणि ८ बड्या शहरांतील जवळपास ६६.९ कोटी लोकांचे आणि खासगी कंपन्यांचा डेटा सापडला आहे. ही माहिती हे चोरटे विकत असतानाची कुणकुण पोलिसांना लागली होती. यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांना शिकविणाऱ्या बायजूस आणि वेदांतू सारख्या कंपन्यांचा देखील यात डेटा आहे. यामध्ये लहान मुलांचाही डेटा असतो. आरोपीकडे ८ मेट्रो शहरांत सेवा देणाऱ्या १.८४ लाख कॅब युजर्सचा, ६ शरहरांती आणि गुजरातच्या ४.५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा आहे. आरोपी विनय भारद्वाजने हा डेटा विकण्यासाठी फरीदाबाद, हरियाणामध्ये ऑफिस थाटले होते. त्याला आमेर सोहेल आणि मदन गोपाल यांनी डेटा मिळवून दिला होता.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डेटा विक्रीला असल्याचे सांगितले जायचे. नफ्यासाठी फसवणूक करणाऱ्यांना डेटा विकला जायचा. GST (पॅन इंडिया), आरटीओ (पॅन इंडिया), अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, यूट्यूब, पेटीएम, फोनपे, बिग बास्केट, बुक माय शो, इन्स्टाग्राम, झोमॅटो, पॉलिसी बाझार, अपस्टॉक्स यासारख्या बड्या कंपन्यांच्या ग्राहकांचा डेटा यामध्ये असल्याचे हैदराबाद पोलिसांनी सांगितले आहे.
२४ राज्यांतील ४८.४० कोटी लोकांचा डेटा यामध्ये आहे. संरक्षण कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पॅन कार्डधारक, इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वीचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिल्लीतील वीज ग्राहक, डी-मॅट खातेधारक, एनईईटीचे विद्यार्थी यांचा समावेश आहे. यामध्ये श्रीमंत व्यक्ती, विमा धारक, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड धारकांच्या डेटा आणि मोबाईल क्रमांकांसह इतर माहिती आहे.
महाराष्ट्रातील साडे चार कोटी लोकांचा डेटा यामध्ये आहे. तर मुंबईतील ४५ लाख लोकांचा डेटा यामध्ये सापडला आहे. पुण्यातील १२ लाख लोकांचा डेटा या चोरांकडे सापडला आहे.