खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; पाच दिवसांनी समजले
By उद्धव गोडसे | Published: November 13, 2023 02:54 PM2023-11-13T14:54:34+5:302023-11-13T14:56:49+5:30
शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकले, पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील घटनेचा पाच दिवसांनी उलगडा, सहा संशयित ताब्यात
- सरदार चौगुले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा डुकरांच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला. राक्षी (ता. पन्हाळा) येथे बुधवारी (दि. ८) रात्री घडलेल्या दुर्घटनेचा सोमवारी (दि. १३) सकाळी उलगडा झाला. शिकारीसाठी तारा लावून मृतदेहांची विल्हेवाट लावणा-या सहा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मृतदेहांचा शोध सुरू आहे. जोतिराम सदाशिव कुंभार (वय ६४) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय ६०, दघे रा. राक्षी) अशी मृतांची नावे आहेत.
पन्हाळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोतिराम आणि नायकू हे दोघे बुधवारी रात्री खेकडे पकडण्यासाठी धरणाचा ओढा परिसरात गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते परत आले नाहीत. दुस-या दिवशी मुलांनी ओढ्यालगत शोध सुरू केला. ड्रोनने शोध घेऊनही कुंभार बंधूंचा मागमूस मिळाला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी दोघे बेपत्ता असल्याची फिर्याद पन्हाळा पोलिस ठाण्यात दिली. तपास सुरू असताना धरणाचा ओढा परिसरात गावातील काही लोकांनी डुकरांच्या शिकारीसाठी विद्युत तारा लावल्या होत्या अशी माहिती पन्हाळा पोलिसांना मिळाली.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, कुंभार बंधूंचा तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आले. शिकारीसाठी तारा लावणा-या सहा जणांनी घाबरून कुंभार बंधूंचे मृतदेह जवळच्या जंगलात फेकले आहेत. पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने मृतदेहांचा शोध सुरू आहे. या घटनेने पन्हाळा परिसरात खळबळ उडाली असून, राक्षी येथील ग्रामस्थांनी पन्हाळा पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.