मस्करीची झाली कुस्करी! हॉटेलच्या मॅनेजरला जावे लागले तुरूंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 08:47 PM2019-05-14T20:47:19+5:302019-05-14T20:49:55+5:30
पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलचा मॅनेजर आहे.
मुंबई - मस्करीची कुस्करी होऊन त्याचा शेवट अखेर तुरूंगात झाला. मस्करी करणाऱ्याचं नावं लक्ष्मीकांत पवार असे असून तो पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलचा मॅनेजर आहे. त्याने केलेली मस्करी चांगलीच भोवली आहे आणि त्याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे - कुर्ला संकुलातल्या (बीकेसी) एका आंतराष्ट्रीय हिऱ्याच्या कंपनीच्या उपाध्यक्षाला पवारने काही दिवसांपूर्वी फोन केला. त्यावेळी फोनवर त्याने स्वत:ची ओळख ही अमली पदार्थ विभागाच्या (अँटी नार्कोटिक युनिट) कांदिवली युनिटचा पोलीस निरीक्षक पवार असल्याचे सांगितले. तसेच त्याने समोरील व्यावसायिकाला आपण एका फौजी नावाच्या नायझेरियन पकडला असून तो तुमच्या संपर्कात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे तुम्ही कांदिवली युनिटला भेट द्या. इतक्यावरच न थांबता पवारने फोनवरून व्यावसायिकाला चौकशीला न आल्यास अटक करण्याची धमकी ही देेेत फोन कट केला.
दहा मिनिटाने त्या व्यावसायिकाने पुन्हा पवारला फोन करून आपण अशा कुठल्याही नायझेरियनच्या संपर्कात नसल्याचे सांगून देखील पवार वेळोवेळी त्यांना अटक करण्याची धमकी देत होता. घाबरलेल्या व्यावसायिकाने अखेर त्याचे मित्र निवृत्त पोलीस उपायुक्त शिरीष इनामदार यांच्याकडे मदत मागितली. नंतर इनामदार यांनी पवार यांना फोन करत त्यांच्याकडून गुन्ह्याचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पवारने इनामदार यांनाही उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर इनामदार यांनी याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त आशितोष ढुंबरे यांना दिली. ढुंबरे यांनी याबाबत अँटी नार्कोटिक सेलचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांना लक्ष घालण्यास सांगितले.
लांडे यांनी कांदिवलीच्या युनिटमध्ये पवारविषयी चौकशी केली. त्यावेळी अशा नावाचा कोणीही पोलीस निरीक्षक नसल्याची माहिती लांडे यांनी मिळाली. लांडे यांच्या पथकाने पवारला चारकोप येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. त्याने आपण मस्करी करत होतो. मला माझा एका मित्राने हा त्याचा नंबर म्हणून दिला. एका हॉटेलबाहेर तो मित्र मला दिसला, त्याला घाबरविण्यासाठी मी फोन केल्याची कबूली पवारने पोलिसांना दिली. मात्र, पवारने दिलेल्या माहितीत आणि वस्तूस्थितीत विसंगती आढळून येत असल्यामुळे पोलिसांनी पवारवर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. पवारने ज्या हॉटेलबाहेर त्याला त्याचा मित्र दिसल्याचे सांगितले होते. तेथील सीसीटिव्ही पाहिलेे असता. त्या सीसीटिव्हीत कुठेही त्याचा मित्र पोलिसांना आढळून आला नाही. या प्रकरणाचा तपास आता खंडणीविरोधी पथकाच्या पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.