पूर्व वैमन्यास्यातून हॉटेल मालकाची हत्या; आरोपीला मुलुंड येथून पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 07:17 PM2019-08-06T19:17:59+5:302019-08-06T19:29:18+5:30
वालीव पोलिसांनी हत्येच्या आरोपीला २४ तासात अटक केली
वसई - रविवारी रात्रीच्या सुमारास पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातील भारत नगरमधील बिस्मिल्ला हॉटेलचा मालक जावेद खान (२६) याची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास करत असताना हत्या करणाऱ्या आरोपीला मुंबईच्या मुलुंड येथून पकडून आणले असून पूर्व वैमन्यास्यातून हत्या केली असल्याचे आरोपीने पोलिसांना जवाब दिला आहे. वालीव पोलिसांनी हत्येच्या आरोपीला २४ तासात अटक केली असून उस्मान खान (२६) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
मृत जावेद खान याचा भाऊ नावेद आणि त्याचा मित्र या दोघांनी मिळून आरोपीच्या भावाला मारहाण केली होती. तसेच एका महिलेवरूनही काही वाद झाले होते. याचाच जाब विचारण्यासाठी रविवारी रात्री आरोपी उस्मान हा सदर ठिकाणी गेला होता पण नावेद न भेटल्यामुळे जावेदला भावाबद्दल विचारपूस करण्यात आली पण यावरून आरोपी आणि मृत या दोघांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाल्यावर उस्मान याने जावेदवर चाकूच्या साहाय्याने हल्ला चढवत गळ्यावर वार करून पळून गेला होता. रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून स्थानिकांनी वालीव पोलिसांना माहिती दिली होती.
घटना काय ?
नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातील भारत नगर येथे जावेद खान (२६) याने स्वतःचे बिस्मिल्लाह नावाचे हॉटेल असून ते त्याने भाड्याने चालवण्यासाठी दिले आहे. जावेद नेहमी हॉटेलच्या बाहेर असलेल्या बाकड्यावर झोपायचा. नेहमीप्रमाणे रविवारीही तो गाढ झोपेत असताना कोणीतरी कोणत्यातरी कारणावरून धारधार चाकूच्या साहाय्याने गळा चिरून हत्या केली होती.