रूमच्या चावीमुळे घरफोडी करणारी गॅंग अटकेत; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 08:42 PM2019-08-22T20:42:09+5:302019-08-22T20:43:01+5:30
7 घरफोडीचे गुन्हे उघड केले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नालासोपारा - रात्रीच्या वेळी जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या चौघांना वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केले असून 7 घरफोडीचे गुन्हे उघड केले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यांचे कोणी साथीदार आहेत का याचा पोलीस शोध घेत आहे.
पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वालीव पोलीस ठाण्याच्या परिसरात घरफोड्या आणि जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने डोकेदुखी बनली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक धायरकर, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस हवालदार मनोज मोरे, सचिन दोरकर, महेश जाधव यांच्या टीमने विशाल प्रमोद गुप्ता (19), राहुल जयप्रकाश मिश्रा उर्फ योगेश (25), विनोद प्रकाश बाबर (24) आणि आतिष दत्ताराम साखरकर (30) या टोळीला पकडले असून 7 गुन्हे उघड करून 1 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रूमच्या चावीने पकडली गेली टोळी....
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे मनोज मोरे, सचिन दोरकर हे रात्रीच्या वेळी हद्दीत गस्त घालत असताना रेकॉर्डवरील घरफोडी करणारा चोरटा त्या दोघांना दिसल्यावर गाडी सोडून पळाला पण गाडीच्या चावीला एका सदनिकेची चावी होती. या चावीवरून राहत असलेल्या इमारतीचा ठिकाणा मिळाला. ज्या एजंटने रूम यांना भाड्याने दिला होता. त्यांचे कागदपत्रे व मोबाईल नंबर मिळाल्यावर या टोळीचे बिंग फुटून पोलिसांनी यांना जेरबंद केले आहे.