डोंगरशेळकी घरफोडीचा लावला छडा; मुद्देमालासह आरोपी जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 07:30 PM2021-09-08T19:30:49+5:302021-09-08T19:33:37+5:30
Crime News : पोलिसांची कारवाई : लातूर जिल्ह्यातील घटना
उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील डोंगरशेळकी येथील दोघांचे घर चोरट्यांनी शुक्रवारी भरदिवसा फोडून सोन्याचांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण २ लाख ५० हजार ८०० रुपयांचा ऐवज पळविला होता. वाढवणा पोलिसांनी अवघ्या २४ तासात चोरट्यांना ताब्यात घेऊन १ लाख ९१ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी सांगितले, डोंगरशेळकी येथील रावसाहेब मुंडे व वैजनाथ पारीत यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ५० हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी भरदिवसा घडली होती. चोरीनंतर चोरट्यांनी पळून जाताना त्यांची दुचाकी गावाबाहेर टाकली होती. याबाबत वाढवणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेमुळे गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. वाढवणा (बु.) ठाण्याचे पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी गुन्हा दाखल झाल्याबरोबर तपासाची चक्रे वेगाने फिरविली. २४ तासात या प्रकरणातील आरोपी संदीप त्र्यंबक पुंडे (२२, रा. जांब, ता. मुखेड) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेल्यापैकी १ लाख ९१ हजारांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत वाढवणा ठाण्याचे पोलीस कर्मचारी साळुंखे, कसबे यांनी त्यांना मदत केली.