घरकाम करणाऱ्या मोलकरणींनी केली चोरी, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त; चार जणांना अटक
By पंकज पाटील | Published: August 29, 2022 08:37 PM2022-08-29T20:37:05+5:302022-08-29T20:37:25+5:30
अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अंबरनाथ : काम करत असलेल्या दोन ठिकाणी मोलकरणींनी चोरी केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे, त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिवाजीनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये एका मोलकरणीने तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून २९ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एटीएम कार्ड असा दोन लाखांचा मुद्देमाल पळवून नेला होता. या प्रकरणी २५ जुलै रोजी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाअंती कर्जत तालुक्यातील शेलू येथील सीमा बुधाडे आणि साईनाथ केळुसकर या दोघांना अटक केली होती. त्यांनी चोरलेले दागिने ठेवल्याचे समजल्यानंतर, संबंधित फायनान्स कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय एटीएम कार्डाच्या आधारे आरोपींची विकत घेतलेल्या वस्तू देखील हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसऱ्या प्रकरणात देखील घरातील मोलकरणीने दोन लाखांचे दागिने चोरल्याचा गुन्हा २१ ऑगस्ट २०२२ रोजी दाखल झाला होता. या प्रकरणी अंबरनाथ येथे राहणाऱ्या सावित्री माणिकपुरी आणि तिची साथीदार दर्शना कदम यांनी गुन्हा केल्याचे समोर आले होते. चोरी प्रकरणी दोघींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला . गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत गुन्हा उघडकीला आणण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे.