घरापासून २५०० किमी दूर दुसऱ्या देशात कसा पोहचला अल्पवयीन मुलगा?; पोलीस हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 12:39 PM2023-05-27T12:39:44+5:302023-05-27T12:40:30+5:30
पोलिसांना मुलाची माहिती मिळाल्यानंतर सर्वात आधी त्याला पोलीस ठाण्याला घेऊन गेले आणि तिथे त्याला खायला दिले
नेदरलँडच्या रस्त्यावर एक अल्पवयीन मुलगा फिरत होता. चौकशीनंतर हैराण करणारा प्रकार समोर आला. हा मुलगा जवळपास अडीच हजार किमी प्रवास करून आला होता जो तुर्की या देशात राहायला होता. जिथे ६ फेब्रुवारीला तुर्कीत विनाशकारी भूकंप आला ज्यात हजारो लोकांचा जीव गेला. सध्या डच पोलीस हा मुलगा इतक्या दूर कसा पोहचला याचा शोध घेत आहेत.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, नेदरलँडच्या मास्ट्रिच शहरातील ही घटना आहे. जिथे रस्त्यावर एकटा मुलगा फिरताना आढळला. पोलिसांनी या मुलाकडे चौकशी केली असता त्याला डच भाषा येत नसल्याचे कळाले. त्याला फक्त तुर्किश भाषा येत होती. अशावेळी पोलिसांनी तुर्कीश दुतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर हा मुलगा तुर्कीचा असल्याचे समोर आले. फेब्रुवारीत याठिकाणी भूकंप झाला होता त्यात त्याचे घर उद्ध्वस्त झाले होते. तो त्याच्या आईवडिलांपासून दुरावला होता.
पोलिसांना मुलाची माहिती मिळाल्यानंतर सर्वात आधी त्याला पोलीस ठाण्याला घेऊन गेले आणि तिथे त्याला खायला दिले. त्यानंतर या मुलाला बालसुधार गृहात पाठवले असून आता त्याला पुन्हा तुर्कीला पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मुलाने सांगितले की, माझे पालक भूकंपात जखमी झाले होते परंतु तो इथं कसा पोहचला हे त्याला सांगता आले नाही. याबाबत डच अधिकारी तपास करत आहेत. तुर्कीश दुतावासाने डचच्या परराष्ट्र मंत्रालयाशी बोलणी सुरू केली आहे.
प्राथमिक संशयानुसार, हा मुलगा मानवी तस्काराचा शिकार झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस या सर्व गोष्टींचा शोध घेत आहेत. ६ फेब्रुवारीला तुर्कीत ७.८ रिश्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. ज्यामुळे देशातील १६ टक्के लोकसंख्येवर त्याचा परिणाम झाला. भूकंपात ५० हजाराहून अधिक लोक मेली. १ लाखाहून अधिक लोक जखमी झाले होते. १० लाखाहून अधिक बेघर झाले. हजारो इमारती उद्ध्वस्त झाल्या. अब्जावधीचे नुकसान झाले.