आफताबने श्रद्धा वालकरचा खून केला कसा? ३,००० पानांचे आरोपपत्र तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:29 AM2023-01-23T06:29:51+5:302023-01-23T06:30:23+5:30
आफताब पूनावाला याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे.
नवी दिल्ली :
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून करून इलेक्ट्रिक करवतीने तिचे तुकडे करणाऱ्या आणि फ्रिजमध्ये ते ठेवून थंड डोक्याने त्याची विल्हेवाट लावणाऱ्या आफताब पूनावाला याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे.
आरोपपत्रात १०० हून अधिक जणांचे जबाब आहेत. त्यातील ५५ जण यातील वेगवेगळ्या घटनांचे साक्षीदार आहेत. अनेक महिन्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोळा केलेले महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक पुरावेही यात आहेत. हे आरोपपत्र जानेवारीअखेर दाखल करण्यात येणार आहे.
आरोपपत्रात आफताबचा कबुलीजबाब, त्याची नार्को टेस्ट आणि फॉरेन्सिक टेस्टचा अहवाल दिला आहे. पोलिसांनी छतरपूरच्या जंगलातून जप्त केलेल्या हाडांचा आणि त्यांच्या डीएनए अहवालाचाही उल्लेख आहे, ज्यावरून ही हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट होते. ४ जानेवारीला दक्षिण दिल्लीतील मेहरौली जंगलात सापडलेले केस आणि हाडांचे नमुनेही श्रद्धाशी जुळतात.
आफताब दोन महिन्यांपासून कोठडीत
आफताबने १८ मे २०२२ रोजी लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने ३०० लीटरचा फ्रीज आणला असता. पोलिसांनी आफताबला पकडले आणि मेहरौलीच्या जंगलातून श्रद्धाची हाडे जप्त केली. २८ वर्षीय आफताब पूनावाला गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहे. आपण श्रद्धाला क्षणिक रागाच्या भरात संपवले होते, असा दावा आफताबने कबुली जबाबात केला आहे.
पोलिस म्हणतात...
३००० पानांचे आरोपपत्र
५५ संबंधितांचे जबाब
श्रद्धाच्या हत्येनंतरही जवळपास दहा दिवस आफताब तिचा फोन, क्रेडिट कार्ड, सोशल मीडिया अकाऊंट वापरत होता.
आफताबसोबतच श्रद्धाला शेवटचे पाहिले गेले.