मित्रांचा आर्थिक स्वार्थ कसा जागा झाला? विद्यार्थ्याचे अपहरण, रोजच एकत्र असायची उठबस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 02:26 PM2024-03-06T14:26:37+5:302024-03-06T14:26:49+5:30
वाशी सेक्टर १० परिसरात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याचे त्याच्याच मित्रांनी अपहरण करून ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पोलिसांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वजण एकमेकांच्या परिचयाचे असून, नेहमीच्या उठण्या-बसण्यातले आहेत. यामुळे त्या रात्री नेमके असे काय घडले, ज्यामध्ये त्यांनी मित्राचे अपहरण करून त्याला सिगारेटचे चटके दिले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
वाशी सेक्टर १० परिसरात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याचे त्याच्याच मित्रांनी अपहरण करून ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात इतरही काहींचा सहभाग असल्याची शक्यता आहे. हे सर्वजण १८ ते २० वयोगटातील असून, त्यात काही अल्पवयीन देखील आहेत.
कुटुंबीयांचे नियंत्रण नव्हते का?
तक्रारदार व गुन्हा दाखल असलेले सर्वजण विद्यार्थी असून, त्यांची नेहमीची एकत्र उठबस असायची. त्यापैकी बहुतेक जण अनेकदा मध्यरात्री घरातून बाहेर येऊन एकत्र फिरत असत. यामुळे कुटुंबीयांचे देखील त्यांच्यावर नियंत्रण नव्हते का, असाही प्रश्न निर्माण होत आहे.
तक्रारदार मुलाचे वडील विद्युत कामाचे ठेकेदार आहेत. यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे असावेत असा त्यांचा समज झाला होता का? की इतर कोणत्या वादाचे कारण त्यामागे आहे? यादृष्टीने तपास सुरू आहे.