लॉटरी नव्हे, तर तिजोरी रिकामी! ऑनलाईन चोरांपासून कसे राहाल सावध? जाणून घ्या सोप्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:09 AM2021-08-10T06:09:40+5:302021-08-10T06:11:17+5:30
फसवे एसएमएस, ई-मेल देतील चकवा
तुम्हाला अमक्या रकमेची लॉटरी लागली आहे. एवढ्या रकमेचे हे बक्षीस तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करून घ्यायचे असेल तर तुमचा तपशील पाठवा, अशी विचारणा करणारे ई-मेल किंवा एसएमएस आजही अनेकांना चकवा देतात. लॉटरी लागल्याच्या वार्तेने हुरळलेल्या व्यक्तीला आपली फसगत होत आहे, हे लक्षातच येत नाही...
मोडस ऑपरेंडी काय?
ऑनलाइन फसवणुकीच्या शोधात असलेले हॅकर्स लॉटरी लागल्याचा खोटा ई-मेल सावजाला पाठवतात.
तुम्हाला अमक्या रकमेची लॉटरी लागली असून बक्षिसाची रक्कम हवी असेल तर बँक खात्याचे तपशील पाठवा, पासवर्ड पाठवा अशी विचारणा त्यात केलेली असते. बक्षिसाची रक्कम पाठवण्याआधी कर भरावे लागतील वगैरे कारणेही सांगितले जातात.
बक्षिसाची रक्कम पाहून भुरळ पडलेला ग्राहक एखाद्या गाफील क्षणी या हॅकर्सच्या जाळ्यात अलगद अडकतो. सर्व तपशील त्यांना देऊन टाकतो. पुढच्याच क्षणी त्याची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते.
काय काळजी घ्यावी?
फसव्या ई-मेल्सकडे सपशेल दुर्लक्ष करा. लॉटरी लागल्याचे ई-मेल वा संदेश आल्यास ते तातडीने उडवून टाका.
ई-मेल वा संदेश उघडून पाहिला तरी त्यातील कोणतीही लिंक ओपन करू नका. लॉटरी लागल्याच्या संदेशांना उत्तर देऊ नका. तुमचा तपशील कोणालाही देऊ नका.