गुन्हे घडतायत तरी किती? राज्यातील आठ कारागृहे हाऊसफुल्ल; मुंबई, ठाण्यात सर्वाधिक कैदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 05:43 AM2024-03-02T05:43:11+5:302024-03-02T05:43:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यभरातील ६० कारागृहांपैकी ८ कारागृहे हाऊसफुल झाली आहेत. यामध्ये मुंबई ठाण्यातील कारागृहात सर्वाधिक कैदी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यभरातील ६० कारागृहांपैकी ८ कारागृहे हाऊसफुल झाली आहेत. यामध्ये मुंबई ठाण्यातील कारागृहात सर्वाधिक कैदी असल्याचे कारागृह विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मुंबईच्या कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट तर ठाण्याच्या कारागृहात चौपट कैदी आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनावरचा ताण वाढताना दिसत आहे. दुसरीकडे हाच ताण कमी करण्यासाठी कारागृह विभागाकडून नवीन कारागृहाच्या उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहे.
महाराष्ट्रात किती कारागृह
महाराष्ट्रात एकूण ६० कारागृहे असून त्यामध्ये मध्यवर्ती (९), जिल्हा (२८), विशेष कारागृह रत्नागिरी (१), मुंबई जिल्हा महिला (१), किशोरीर सुधारालय नाशिक (१), खुले (१९) तर खुली वसाहत (१) यांचा समावेश आहे.
वकील नेमण्यासाठी, जामिनासाठी पैसे नाहीत म्हणून...
कारागृहातील बऱ्याच क़ैद्यांकडे वकील नेमण्यासाठी, जामिनासाठी पैसे नाहीत म्हणून त्यांना कारागृहातच कैद राहावे लागत आहे. त्याचाही कारागृह प्रशासनावर ताण वाढताना दिसत आहे. यासाठी कारागृह विभागाने गरीब कैद्यांना जामिनासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहे.
न्यायाधीन कैद्यांची गर्दी जास्त...
महाराष्ट्रातील एकूण कारागृहात कैद्यांची क्षमता २६ हजार ३७७ असताना ३१ जानेवारी २०२४ पर्यंत ४० हजार ४८५ कैदी आहे. यामध्ये ३८ हजार ८५७ पुरुष कैद्यांसह १६०६ महिला तर २२ तृतीयपंथी कैद्यांचा समावेश आहे. यामध्ये सिद्धदोष (७८५०), न्यायाधीन (३२,२१५) तर स्थानबद्ध इतर (४२० ) प्रकारच्या कैदी आहे.
या आठ कारागृहांमध्ये सर्वाधिक कैदी
कारागृह बंदीक्षमता प्रत्यक्ष संख्या
कल्याण जिल्हा वर्ग १ ५४० २१९१
ठाणे मध्यवर्ती ११११ ४१८४
मुंबई मध्यवर्ती ९९९ ३७२२
बुलढाणा जिल्हा वर्ग २ १०१ ३५४
सोलापूर १४१ ४६२
नांदेड जिल्हा वर्ग २ २०४ ६०१
जळगाव जिल्हा २ २०० ५२०
येरवडा मध्यवर्ती २७५२ ६५२५