बँकेसमोर चहा विकणाऱ्या तरुणाने बँकेलाच लावला कोट्यवधीचा चूना; जाणून घ्या कसं घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:15 PM2020-06-17T12:15:58+5:302020-06-17T12:33:42+5:30
माहितीनुसार, आरोपी पंकज गुप्ताने बँक कर्मचाऱ्यांचा पासवर्ड चोरून स्वत:च्या आणि नातेवाईकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले.
कानपूर - बँक ऑफ इंडियाच्या महाराजपूर शाखेत ४ महिन्यांपूर्वी झालेल्या दीड कोटीच्या घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला अटक करण्यात आली आहे. यानंतर आता पोलिसांना इतर आरोपींचा शोध घेणे सुरु केले आहे. काही महिन्यांपूर्वी बँक ऑफ इंडियाच्या महाराजपूर शाखेत कोट्यवधीचा घोटाळा उघडकीस आला होता.
महाराजपूर शाखेतील ग्राहकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये गायब झाले. यानंतर ग्राहकांनी बँकेत येऊन जाब विचारला असता हा प्रकार समोर आला. २४ पेक्षा जास्त ग्राहकांच्या खात्यातून १ कोटी ४१ लाख रुपये हडप करण्यात आले होते. घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी २९ फ्रेब्रुवारीला मजूर पंकज गुप्ता आणि त्याच्या अन्य ११ साथीदारांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
माहितीनुसार, आरोपी पंकज गुप्ताने बँक कर्मचाऱ्यांचा पासवर्ड चोरून स्वत:च्या आणि नातेवाईकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. महाराजपूर पोलीस ठाण्यात अनेक महिन्यापासून या प्रकरणाची चौकशी सुरु होती, त्यात आरोपी पोलिसांपासून दूर होता. अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर ३ दिवसांपूर्वी पोलिसांना मुख्य आरोपींबाबत माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले.
नरवर पोलीस निरीक्षक राम अवतार यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपी पंकजचे वडील चायचं दुकान चालवत होते, पंकजही त्याच दुकानात काम करतो, पंकजचे वडील २० वर्षापूर्वी फतेहपूरहून येऊन हाथीपूर येथे वास्तव्यास आले होते. ५ हजाराची नोकरी करणारा पंकज वर्षभरात मालामाल झाला होता. तो सायकल सोडून लग्जरी कारमध्ये बसून फिरु लागला. ज्यामुळे पंकज पोलिसांच्या संशयात सापडला होता.