ऋषिकेश देशमुख यांना तूर्तास दिलासा नाहीच; अटकपूर्व जामिनीवरील सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 03:17 PM2021-11-12T15:17:12+5:302021-11-12T15:24:02+5:30
Hrishikesh Deshmukh is not get relief : मनी लााँड्रिंग प्रकरणी ऋषिकेशसह अन्य देशमुख कुटुंबियांनाही ईडीकडून चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आले आहे.
मुंबई - ऋषिकेश देशमुख यांना तूर्तास कोणताही दिलासा नाही. ऋषिकेश यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. ऋषिकेश देशमुख हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा आहे. मनी लााँड्रिंग प्रकरणी ऋषिकेशसह अन्य देशमुख कुटुंबियांनाही ईडीकडून चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आले आहे.
तसेच मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांचा मुलगा ऋषिकेश याचा अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
ऋषिकेश देशमुख यांना शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे यासाठी हे ईडीने समन्स पाठवले होते. मात्र, ऋषिकेश देशमुख या चौकशीला हजर राहिले नसून त्यांनी पंधरा दिवसांची वेळ मागितली. देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंज यांच्यामार्फत ही माहिती देण्यात आली. दुसऱ्यादिवशी म्हणजे ६ नोव्हेंबरला ऋषिकेश देशमुख यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
अनिल देशमुख हे १ नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले होते. त्यांची १३ तास चौकशी करण्यात आली आणि १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता, मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल करत, देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती.