पोलिसांशी हुज्जत चांगलीच भोवली, न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली
By देवेंद्र पाठक | Published: March 2, 2023 11:38 PM2023-03-02T23:38:55+5:302023-03-02T23:39:13+5:30
हा निकाल जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांनी गुरुवारी दिला.
धुळे : चाळीसगाव चौफुलीवर पोलिसांनी एका गुन्ह्यात पकडल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालणे, दमबाजी करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी सादीक शेख नूर मोहम्मद शेख (वय ४५, रा. धुळे) याला ४ वर्षांची शिक्षा आणि २ हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांनी गुरुवारी दिला.
चिखलठाणा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पकडण्यासाठी सादीक शेख नूर मोहम्मद शेख हा चाळीसगाव चौफुलीवर असताना त्याला पकडण्यासाठी पोलिस आले होते. त्यांच्या मदतीला चाळीसगाव रोड पोलिसांनी धाव घेतली. सादीक शेख याला ताब्यात घेतले असता त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. ही घटना ३ जुलै २०१७ रोजी घडली होती. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलिसांना धमकी दिली होती. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात सादीक शेख याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी केला आणि न्यायालयात दोषारोप दाखल केले. याप्रकरणी जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी वकील संजय मुरक्या यांनी सात साक्षीदार तपासले. आरोप सिद्ध झाल्याने शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सरकारी वकील जगदीश सोनवणे, भारत भोईटे आणि शुभांगी जाधव यांचे सहकार्य लाभले.