खाकी वर्दीची माणूसकी; रस्त्यावर तडफडणार्या वृद्धाचे वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 08:46 PM2019-05-28T20:46:15+5:302019-05-28T20:51:18+5:30
कित्येक दिवस पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे कृश-अशक्त झालेले शरीर पाहून या चार शिलेदारांनी त्यांना ताबडतोब विरारच्या महापालिका रुग्णालयात दाखल केले.
नालासोपारा - भर उन्हात रस्त्यात तडफडणार्या एका 75 वर्षीय वृद्धाचे प्राण वाचवून अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातील चार पोलीसांनी खाकी वर्दीतील माणूसकी दाखवून दिली आहे.
विरार पूर्वेकडील अर्नाळा रोडवरील ओलांडा रस्त्याच्या कडेला एका वृद्ध भर उन्हात तडफडत असलेला पोलीस नाईक एल. डी. चंदनशिवे, निलेश गुजर, लेंगरे, कोळेकर यांना दिसून आला. त्यांनी लागलीच सदर वृद्धाला आधार देवून त्याची विचारपूस केली. मात्र, आधार हरवल्यामुळे त्याची मानसिक स्थिती ढासळली होती, धड बोलताही येत नव्हते. या पोलीसांनी त्यांना लागलीच पाणी आणि ज्युस पाजले. त्यामुळे त्यांच्या जीवात जीव आला. कित्येक दिवस पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे कृश-अशक्त झालेले शरीर पाहून या चार शिलेदारांनी त्यांना ताबडतोब विरारच्या महापालिका रुग्णालयात दाखल केले.
तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर हायसे वाटले. खुद्द पोलीसांनीच आपल्याला मदतीचा हात दिला, हे पाहून त्यांना धीर आला. पोलीसांनीही संधी साधून त्यांना बोलते केले. त्यावेळी इक्बाल अहमद शेख असे त्यांनी स्वतःचे नाव सांगितले. तसेच फक्त ब असा आपल्या गावाचा उल्लेख केला. त्यामुळे आम्ही अनुभवाने बीड पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यावर 5 मे पासून शेख बेपत्ता असल्याची तक्रार सदर पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे समजले. या ठाण्यातून शेख यांच्या मुंबई येथील नातेवाईकांचा पत्ता माहित केला. त्यानंतर खार येथून त्यांच्या नातेवाईकांना बोलवून शेख यांना ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलीस निरिक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी सांगितले आहे.