स्वातंत्र्यदिनी माणुसकीला काळीमा! ७५ वर्षीय वृद्धेवर सामूहिक बलात्कार, तृणमूलच्या नेत्यांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 09:05 PM2021-08-15T21:05:41+5:302021-08-15T21:11:16+5:30
पश्चिम बंगालमध्ये स्वातंत्र्य दिनीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये स्वातंत्र्य दिनीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एक ७५ वर्षीय महिला व तिच्या सुनांवर लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित परिसरात तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळावर पोलीस पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, टीएमसीकडून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
कोलकात्यातील मेदिनापूरच्या खेजुरीच्या ब्लॉक नंबर दोन येथील मुरलीचक गावात ही घटना घडली आहे. पीडित कुटुंबाच्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते चटियाल, शतदल मंडल आणि शंकर सीट हे दरवाजा तोडून घरात घुसले. तिघांनीही घरातील महिलांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली पण त्या कशाबशा त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाल्या. घरातील सुना पळ काढण्यात यशस्वी झाल्या होत्या. पण घरात ७५ वर्षीय आजी होत्या. आरोपींनी कसलाही विचार न करता वृद्ध महिलेचं लैंगिक शोषण केलं असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक, अतिरिक्त पोलीस अधिक्षक आणि सीआय व अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
भाजपा आणि टीएमसीमध्ये आरोप-प्रत्यारोप
या घटनेनंतर भाजपानं टीएमसीवर जोरदार हल्लाबोल करत थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. "राज्याचं नेतृत्व एक महिला नेता करत आहे. असं असूनही राज्यातील महिलांसोबत असा धक्कादायक प्रकार घडत आहेत ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. वृद्ध महिलेवर अत्याचार झाले आहेत की नाही याची माहिती आम्हाला नाही. पण दीदींच्या बंगालमध्ये महिला सर्वाधिक उपेक्षित आणि त्यांची प्रतारणा केली जात आहे", असं भाजपाचे सचिव पबित्रा दास यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे सहअध्यक्ष श्यामल मिश्रा यांनी भाजपाचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. तृणमूलवर केलेले आरोप पूर्णपणे निराधार असून जाणून बुजून पक्षाचं नाव बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. दुष्कर्म करणारा तृणमूलचा नव्हे, तर भाजपाचे कार्यकर्ते असून यात त्यांचाच हात आहे. भाजपाकडून खोटे आरोप करुन शांती भंग करण्याचं काम केलं जात आहे, असं श्यामल मिश्रा यांनी म्हटलं आहे.