आखाती देशात नोकरी लावण्याची बतावणी करून शेकडो युवकांना लाखोंना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 08:01 PM2019-11-12T20:01:26+5:302019-11-12T20:04:20+5:30

दोघांना अटक

Hundreds of youths duped lakhs of rupees, pretending to have good jobs in the Gulf country | आखाती देशात नोकरी लावण्याची बतावणी करून शेकडो युवकांना लाखोंना गंडा

आखाती देशात नोकरी लावण्याची बतावणी करून शेकडो युवकांना लाखोंना गंडा

Next
ठळक मुद्देअक्रम शरीफ शेख (वय ४७, चिता कॅम्प, ट्रॉम्बे) आणि शाबीर अकबर मास्टर उर्फ मुन्ना (५२, रा.डोंगरी ) यांना अटक लाखो रुपयांच्या रोकडीसह ७९ पासपोर्टसह ३० जणांचे आखाती देशाचे व्हिसाच्या फोटोप्रिंट,रबरी शिक्के जप्त केले आहेत.

मुंबई - आखाती देशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावण्याच्या आमिषाने बेरोजगार तरुणांना गंडा घालणाऱ्या एका टोळीचा छडा लावण्यात मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर येथील एका कार्यालयावर छापा टाकून दोघांना अटक केली आहे. अक्रम शरीफ शेख (वय ४७, चिता कॅम्प, ट्रॉम्बे) आणि शाबीर अकबर मास्टर उर्फ मुन्ना (५२, रा.डोंगरी ) यांना अटक करुन लाखो रुपयांच्या रोकडीसह ७९ पासपोर्टसह ३० जणांचे आखाती देशाचे व्हिसाच्या फोटोप्रिंट,रबरी शिक्के जप्त केले आहेत.

त्यांचा आणखी एक साथीदार परराज्यात फरारी असून तिघांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार,गुजरात, ओडिसा आदी राज्यातील शेकडो युवकांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले आहे, असे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. धारावीत रहात असलेल्या जाहिद खान या ३७ वर्षाच्या तरुणाला कुवेतमध्ये नोकरी मिळेल, असे आमिष मुन्ना व शेख यांनी दाखविले होते. त्यासाठी व्हिसा व अन्य आवश्यक बाबींची पुर्तता करण्यासाठी त्याच्याकडून ७० हजार रुपये मस्जिद बंदर स्थानकासमोरील पटवा चेंबर्समधील तिसऱ्या मजल्यावर एका गाळ्यात सुरु असलेल्या कार्यालयात दिले होते. मात्र, त्यानंतर त्याला परदेशात पाठविण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने त्याने गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-१ कडे तक्रार केली. 

प्रभारी निरीक्षक विनायक मेर यांच्य सूचनेनुसार पथकाने त्याठिकाणी जावून पाहणी केली असता तेथे दोन संगणक, प्रिंटर, कुवेत देशाचे व्हिसाच्या फोटो प्रिंट, चार रबरी शिक्के व चार लाखावर रोकड मिळून आली. दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली. त्यामध्ये आखाती देशात नोकरीच्या आमिषाने ७० ते ७५ हजार रुपये एका युवकाकडून घेत असत. त्यापैकी काही रक्कम सुरवातीला घेवून संबंधित युवकांकडून त्यांचे पासपोर्ट व अन्य कागदपत्रे मिळवित असत, परदेशात जाण्यासाठी आवश्यक व्हिसा मिळवित असल्याचे भासवित, खोटे रबरी शिक्के बसवून त्यांना बनावट व्हिसा देवून फसवणाूक केली जात असल्याचे उघडकीस आले. या टोळीत आणखी एक जण असून तो परराज्यात पळून गेला आहे. शेख व मुन्ना याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीतील अन्य साथीदारांचा शोध सुरु असून फसवणूक झालेल्या युवकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त शहाजी उमाप यांनी केले आहे.

Web Title: Hundreds of youths duped lakhs of rupees, pretending to have good jobs in the Gulf country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.