पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा ‘हंटर’, गांजा तस्करीत सहभागी कॉन्स्टेबल बडतर्फ
By योगेश पांडे | Published: May 13, 2024 09:58 PM2024-05-13T21:58:09+5:302024-05-13T21:58:51+5:30
रेल्वेत महिला पोलिसाशी छेडछाड करणारे दोघे कर्मचारी निलंबित
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी गांजा तस्करीत सहभागी असलेल्या एका हवालदाराला बडतर्फ केले आहे तर सहकारी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित केले आहे. यापुढे अवैध कामांत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर लगेच कठोर कारवाई करण्याचा इशारा यातून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रोशन उगले असे गांजा तस्करीत सहभागी असलेल्या हवालदाराचे नाव आहे. तर युवराज राठोड व आदित्य यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. रोशन उगले याला २०२१ मध्ये पत्नीसह ओरिसा येथून गांजाची खेप आणताना रंगेहाथ पकडण्यात आले होते व एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रोशनला निलंबित करण्यात आले होते. विभागीय चौकशीही करण्यात आली. तब्बल तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही रोशनवर कोणतीही कठोर कारवाई झाली नव्हती. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांनी तातडीने कारवाई केली व त्याला नोकरीतून बडतर्फ करण्याचा आदेश जारी करण्यात आला.
तर युवराज राठोड व आदित्य यादव यांनी पुणे जिल्ह्यात निवडणूक ड्युटीसाठी पाठविण्यात आले होते. विविध पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष कर्मचारी रेल्वेने पुण्याला जात होते. यावेळी दोघांनी मद्य प्राशन केले व बोगीत गोंधळ घातला. नशेत त्यांनी सहकारी महिला कर्मचाऱ्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. त्यांना विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ सुरू केली. इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवला. पीडित महिला कर्मचाऱ्याने जीआरपीकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली. हे प्रकरण तापताच दोन्ही जवानांना नागपूरला बोलावण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ.सिंगल यांनी दोघांनाही निलंबित केले.