तक्रार मागे घेण्यासाठी विवाहितेला पती आणि सासूची जबर मारहाण, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Published: February 19, 2024 08:22 PM2024-02-19T20:22:12+5:302024-02-19T20:22:48+5:30

मुलांना भेटण्यासही केला मज्जाव

Husband and mother-in-law violently beat up a married woman to withdraw her complaint, a crime in Naupada police station | तक्रार मागे घेण्यासाठी विवाहितेला पती आणि सासूची जबर मारहाण, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

तक्रार मागे घेण्यासाठी विवाहितेला पती आणि सासूची जबर मारहाण, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पतीशी झालेल्या वादानंतर गुजरात येथील माहेरुन मुलांना भेटण्यासाठी आलेल्या निशा प्रजापती (३२, रा. बलसाड, गुजरात) या विवाहितेला तिचा पती राजेश (३७) आणि सासू नगीणा प्रजापती (६५) या दोघांनी आधीची तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. शिवाय, तिला मुलांनाही भेटण्यास मज्जाव केला. याप्रकरणी निशा हिने पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली.

राजेश आणि निशा यांचा विवाह २०१३ मध्ये ठाण्यात झाला. त्यांना मोहित (९), प्रथम (८) आणि मुलगी आसुई (६) ही मुलेही आहेत. तिघांपैकी प्रथम याला दुर्धर आजार असल्याने तो गुजरातला आजोळी वास्तव्याला आहे. या दाम्पत्यांमध्ये लग्नापासूनच क्षुल्लक कारणावरुन वाद व्हायचे. यातूनच राजेश पत्नीला नेहमी मारहाण करीत होता. तिच्या तक्रारीनुसार २९ मे २०२१ रोजी किरकोळ कारणावरुन त्याने पत्नीला मारहाण करुन घराबाहेर काढले. तेंव्हापासून निशा तिच्या आई वडिलांकडे गुजरातमध्ये वास्तव्याला गेली. मोठा मुलगा मोहित आणि मुलगी आसुई या दोन्ही मुलांना राजेशने त्याच्याकडे ठेवले होते. याच मारहाण प्रकाराची केस ठाणे न्यायालयात असल्याने १७ फेब्रुवारी २०२४ रोजी ती गुजरात येथून ठाण्यात आली. तिचा पतीही ठाणे न्यायालयात आला. तेंव्हा मुलांना भेटण्याची तिने पतीला विनंती केली. पतीसोबत ती दुपारी १.२० वाजण्याच्या सुमारास गावदेवी येथील घरीही गेली. तेंव्हा ती घरात असतांना पती आणि सासूने घराचा दरवाजा आतून बंद केला.

कोर्टात दाखल असलेली केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला. तिने नकार दिल्यावर त्यांनी तिला शिवीगाळ करीत धमकीही दिली. केस मागे न घेतल्यास मुलांनाही भेटू देणार नाही, असेही तिला सुनावले. तरीही तिने नकार दिल्यानंतर सासूने तिच्या डाव्या डोळयावर बुक्की मारली. त्यानंतर लाकडी दांडक्याने सासू आणि पतीने तिला जबर मारहाण केली. तिला आता जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पती आणि सासूविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची तक्रार १९ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Husband and mother-in-law violently beat up a married woman to withdraw her complaint, a crime in Naupada police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे