भररस्त्यात पती-पत्नीला २ नराधमांनी अडवलं; विवाहितेवर लैंगिक अत्याचार, जिल्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 08:21 AM2022-03-08T08:21:23+5:302022-03-08T08:21:36+5:30

घटनेनंतर भेदरलेल्या अवस्थेत हे पती-पत्नी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालय प्रशासनाने ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडिता व तिच्या पतीचा जबाब घेतला

Husband and wife were stopped by 2 men; Sexual abuse on married, incident in Buldhana district | भररस्त्यात पती-पत्नीला २ नराधमांनी अडवलं; विवाहितेवर लैंगिक अत्याचार, जिल्हा हादरला

भररस्त्यात पती-पत्नीला २ नराधमांनी अडवलं; विवाहितेवर लैंगिक अत्याचार, जिल्हा हादरला

Next

एका २४ वर्षीय विवाहितेने बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, शहरातील एका नगरात राहणारे हे पती-पत्नी ६ मार्च रोजी धाड येथे भाड्याने राहण्यासाठी रूम शोधण्यासाठी गेले होते. धाड येथे सायंकाळी साडेपाच वाजता पोहोचल्यानंतर काम आटोपून रात्री दहा ते साडेदहा वाजेदरम्यान धाडहून बुलडाण्याकडे ते येत असताना रात्री ११.३० वाजेदरम्यान चिखला घाटाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली. त्यातील एकाने हातात दगड घेऊन पीडितेच्या पतीस बेदम मारहाण केली, तर दुसऱ्याने पीडितेला रस्त्याकडेला नेऊन तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्यानेही विवाहितेवर जबरदस्ती अत्याचार केला.

घटनेनंतर भेदरलेल्या अवस्थेत हे पती-पत्नी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालय प्रशासनाने ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडिता व तिच्या पतीचा जबाब घेतला. याप्रकरणी विवाहितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध विविध कलमांन्वये ७ मार्च रोजी सकाळी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पीडित विवाहिता आणि तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सदानंद सोनकांबळे करीत आहेत. अद्याप आरोपींचा शोध लागला नसून, शोध सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी घेतली पीडितेची भेट

जागतिक महिला दिनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा हादरला असून, घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित विवाहितेची विचारपूस करून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.

अप्पर पोलीस महासंचालक शहरात अन् घडली अत्याचाराची घटना

राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक मधुकर पाण्डेय वार्षिक निरीक्षणासाठी सकाळीच शहरात दाखल झाले. ते दाखल होण्याआधीच घडलेल्या या अत्याचाराच्या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

Web Title: Husband and wife were stopped by 2 men; Sexual abuse on married, incident in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.