चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस अटक; ठाण्यातील घटना
By जितेंद्र कालेकर | Published: September 24, 2022 07:02 PM2022-09-24T19:02:33+5:302022-09-24T19:03:45+5:30
लोखंडे यांच्या घरात पती पत्नींच्या भांडणाचा जोर जोरात आवाज येत होता.
ठाणे: चारित्र्याच्या संशयातून मीना लोखंडे (२३) या आपल्या पत्नीचा दारुच्या नशेतच गळा आवळून खून करणाºया अनिल लक्ष्मण लोखंडे (२८, रा. इंदिरानगर, कळवा, ठाणे) या पतीस अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी शनिवारी दिली. आरोपीला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
आरोपी अनिल याची पहिली पत्नी दोन वर्षांपूर्वीच त्याला सोडून निघून गेली आहे. मीना ही दुसरी पत्नी होती. त्यांना एक वर्षांची मुलगीही आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिलाही त्याच्या चारित्र्यावर संयश होता. यातूनच त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. २२ सप्टेंबर रोजी रात्रीही त्यांच्यात याच कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारासही हा वाद आणखीनच उफाळून आला. अखेर अनिल याने याच रागातून मीनाचा आपल्या एक वर्षांच्या मुलीसमोरच हाताने गळा आवळून खून केला.
लोखंडे यांच्या घरात पती पत्नींच्या भांडणाचा जोर जोरात आवाज येत होता. या दोघांचा तसेच त्यांच्या मुलीचा आवाज ऐकून शेजारी राहणारे टेलर रामचंद्र दळवी (३९) यांच्यासह रहिवाशांनी लोखंडे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घरात अनिलची पत्नी मीना निपचित पडलेली आढळली. ही माहिती रहिवाशांनी कळवा पोलिसांना दिली. त्यानंतर अनिल याने रागाच्या भरात तिचा गळा आवळल्याची कबूली पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने मीना हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.