पत्नीचा खून करून फरार झालेला पती शिक्रापूर परिसरातून जेरबंद;गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 03:14 PM2020-07-08T15:14:15+5:302020-07-08T15:17:55+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरार झालेला पती आत्महत्या करण्याच्या तयारीत होता.
पिंपरी : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरार झालेला पती आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला जेरबंद केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी व आत्महत्येसाठी तो वापरणार असलेली नायलॉनची दोरी पोलिसांनी जप्त केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मंगळवारी (दि. ७) ही कारवाई केली.
करीम शाह अहमद शेख (वय ६४, सध्या रा. मामुर्डी, मूळ रा. श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर हबीदा शेख (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने रविवारी (दि. ५) सकाळी साडेआठच्या सुमारास पत्नी हबीदा शेख हिचा लोखंडी पट्टीने वार करून खून केला. त्यानंतर आरोपी याने त्याचा व पत्नी हबीदा हिचा मोबाईल घटनास्थळावर टाकून पळ काढला होता. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.
आरोपी हा पुणे - नगर रस्त्यावरील रांजणगाव परिसरात फिरत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार युनिट पाचचे पथक रवाना झाले. दिघी येथील नागरिक मनोज कदम यांच्या मदतीने आरोपी याला पोलिसांनी शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीच्या चारित्र्यावर त्याला संशय होता. तिला त्यापासून परावृत्त करण्याचा आरोपी प्रयत्न करीत होता. परंतु पत्नीच्या वागण्यात बदल झाला नाही. याचा राग आल्याने आरोपीने तिचा खून केला. तसेच स्वत: देखील आत्महत्या करणार असल्याबाबत आरोपीने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले होते. आत्महत्या करण्यासाठी पिवळ्या रंगाची रस्सी त्याने विकत घेतली होती. रस्सी व चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपीला देहूरोड पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनंजय भोसले, फारूक मुल्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली.