चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर पतीला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:50 AM2019-05-10T01:50:30+5:302019-05-10T01:50:34+5:30
चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना पश्चिमेतील जोशीबाग परिसरात बुधवारी घडली.
कल्याण - चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना पश्चिमेतील जोशीबाग परिसरात बुधवारी घडली. पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती विकास शिगवण (३२) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.
पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणारा विकास हा पत्नी काजल (२२) हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरुन दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादाला कंटाळलेली काजल आपल्या मुलीसोबत जोशीबाग येथील लक्ष्मीबाई परदेशी चाळीमध्ये आईवडिलांकडे राहत होती. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास काजलचे आईवडील कामावर निघून गेले. त्यावेळी, काजल आणि त्यांची मुलगी अशा दोघींच घरी होत्या. हीच संधी साधत घराच्या पाठीमागील दरवाजाने विकास घरात घुसला. घरात येताच त्याने दरवाजाला आतून कडी लावून काजलला कोंडून ठेवले. त्यांनतर सोबत आणलेल्या चाकूने काजलच्या गळ्यावर, छातीवर वार केले.
हल्ला वाचविण्याचा प्रयत्न करणाºया काजलच्या हातावरही विकासने वार केले. या घटनेमुळे घाबरलेल्या काजलने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता विकासने तिच्या पायावर वार केले.
‘तुला जिवंत ठेवणार नाही, तू माझी झाली नाही, तर कुणाचीही होऊ देणार नाही’ असे धमकावत त्याने जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी काजलने दिलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून विकास शिगवन याला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी दिली.