पत्नीच्या खुनानंतर पतीने केला दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 07:32 PM2019-11-06T19:32:49+5:302019-11-06T19:35:08+5:30
गाढ झोपेत असताना संशयाने पछाडलेल्या पतीने झोपेतच पत्नीचा गळा दाबून खून केला.
वाळूज महानगर : चारित्र्याच्या संशयावरून रविवारी रात्री पत्नी रेखाचा खून केल्यानंतर पती अण्णा गायके याने आत्महत्या करण्याचा दोन वेळा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. संशयाच्या भुतामुळे गायके दाम्पत्याचा संसार उघड्यावर आला आहे.
बजाजनगरातील सुयोग हौसिंग सोसायटीत अण्णा एकनाथ गायके हा पत्नी रेखा, मुलगी वैष्णवी, वडील एकनाथ व आई चंद्रभागा यांच्यासमवेत किरायाच्या घरात राहतो. अण्णा वाहनचालक म्हणून काम करतो. त्याच्या वेतनातून घर चालविणे अवघड जात असल्यामुळे रेखाने वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. या दोघांचा संसार सुखात सुरू असताना रेखा सतत कुणाशी तरी मोबाईलवर बोलत असल्याचे लक्षात येताच अण्णाचे तिच्याशी खटके उडू लागले. यानंतर अण्णाने रेखाला कंपनीत जाण्यास मज्जाव केला. या दोघांतील वाद वाढतच चालल्यामुळे अण्णाने आठवडाभरापूर्वी नातेवाईकांना बोलावून या प्रकाराची माहिती दिली. नातेवाईकांनी दोघांचीही समजूत काढली. मात्र, त्यानंतरही रेखा कुणाबरोबर तरी सतत मोबाईलवर बोलत असल्याचे लक्षात येताच रागाच्या भरात अण्णाने तिचा मोबाईल फोडला होता. दरम्यान, रविवारी रेखाकडे नवीन मोबाईल दिसल्यामुळे दोघांत पुन्हा वाद झाला. रात्री सर्व कुटुंबियांनी जेवण केल्यानंतर अण्णाचे आई-वडील नात वैष्णवीला सोबत घेऊन एका रूममध्ये झोपले, तर दोघे पती-पत्नी दुसऱ्या रूममध्ये झोपले होते.
रविवारी रात्री रेखा गाढ झोपेत असताना संशयाने पछाडलेल्या अण्णाने झोपेतच तिचा गळा दाबून खून केला. ती मृत झाल्याची खात्री पटताच अण्णाने दोन्ही हातांच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न फसल्यानंतर त्याने बाथरूममधील फिनेल प्राशन करून तो मृत रेखाच्या शेजारी झोपला. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास वैष्णवी झोपेतून उठून रडायला लागल्यानंतर तिची आजी चंद्रभागा या रेखाला उठविण्यासाठी गेल्या. मात्र, रेखा हालचाल करीत नसल्याने त्यांनी अण्णाला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला. फिनेल प्राशन करूनही मृत्यू न झाल्यामुळे अण्णाने पश्चात्ताप करीत आपणच रेखाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या घटनेत रेखाचा मृत्यू झाला असून, अण्णा गायके याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल चासकर हे करीत आहेत.