बापरे! डॉक्टरनं महिला रुग्णाला पाहून म्हटलं 'सुंदर'; भडकलेल्या पतीनं ‘असं’ काही केलं की...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:30 AM2021-09-29T10:30:26+5:302021-09-29T10:34:38+5:30
त्या महिलेची तपासणी केल्यानंतर मी त्यांना सांगितले तुम्हाला काही समस्या नाही. तुमची त्वचा सुंदर आहे. केवळ महिलेच्या त्वचेबद्दल डॉक्टर म्हणून माझं मत मांडत होतो असं डॉक्टर म्हणाले.
नवी दिल्ली – एका डॉक्टरला महिला रुग्णाचं कौतुक करणं चांगलंच महागात पडलं आहे. महिलेनं तिच्या पतीला हा सगळा प्रसंग सांगत तक्रार केली. त्यानंतर महिलेच्या पतीनं डॉक्टरला बेदम मारलं. या प्रकरणात महिलेच्या पतीला घरीच अटक करण्यात आली आहे. तर चेकअपवेळी महिलेशी आदराने संवाद साधला होता असं डॉक्टरचं म्हणणं आहे. नेमकं काय प्रकार घडलाय पाहूया.
ही घटना रशियातील आहे. याठिकाणी त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर व्लादिमीर जिरनोकलेव(Vladimir Zhirnokleev) यांच्याकडे एक महिला पतीसोबत उपचारासाठी आली होती. चेकअपच्या नंतर महिला डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर तेव्हा तिने पती बखरीद्दीन अजीमोव यांना सांगितले की, डॉक्टरने तिच्या त्वचेला सुंदर म्हटलं. डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, महिलेने पतीला तक्रार केल्यानंतर पती अजीमोवला इतका राग आला की, त्याने थेट डॉक्टर जिरनोकलेव यांच्याकडे गेला आणि त्यांच्याशी वाद घातला.
डॉक्टर आणि महिलेचा पती यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर महिलेच्या पतीने डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरच्या नाकाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेवर डॉक्टर जिरनोकलेव यांनी स्पष्टीकरण दिले की, त्याने महिलेला तिचं कोपर, पोट आणि पाठ दाखवायला सांगितली होती. मी तिला कपडे उतरवण्यासाठी बोललो नाही. त्या महिलेची तपासणी केल्यानंतर मी त्यांना सांगितले तुम्हाला काही समस्या नाही. तुमची त्वचा सुंदर आहे. केवळ महिलेच्या त्वचेबद्दल डॉक्टर म्हणून माझं मत मांडत होतो असं डॉक्टर म्हणाले.
महिलेच्या पतीचा काय आहे आरोप?
२९ वर्षीय बखरीद्दीन अजीमोव यांनी आरोप केला की, डॉक्टरने चेकअपच्या वेळी माझ्या बायकोची स्तुती केली. जे माझ्या तत्वांविरोधात आहे. तसेच जर तुम्ही डॉक्टर आहात तर तुम्ही तुमचं काम करा. विनाकारण स्तुती आणि प्रश्न डॉक्टरी व्यवसायाविरोधात आहेत. सध्या या घटनेनंतर अजीमोवला घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पुढील कारवाई कायदेशीररित्या करणार असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात इतर डॉक्टरांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.