'तू रात्री कोणाबरोबर बोलत असतेस' हे विचारणाऱ्या पतीला पत्नीची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:17 AM2020-08-08T11:17:17+5:302020-08-08T11:19:04+5:30
मुलांकडूनही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी
पिंपरी : तू रात्री कोणाबरोबर बोलत असतेस, असे पतीने विचारले. त्यामुळे पत्नीने पतीला किचनमधील उलथन्याने मारहाण केली. तसेच मुलगा व मुलीने देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. गणेश नगर, बोपखेल येथे शुक्रवारी (दि. ७) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
कृष्णा अण्णापा खांडेकर (वय ५५, रा. गणेश नगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नी कल्पना खांडेकर (वय ४३), मुलगा अजय खांडेकर (वय २४), मुलगी काजल खांडेकर (वय २२) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी दुपारी साडेतीनला घरी होते. तू रात्री कोणाबरोबर बोलत असतेस, असे फिर्यादी यांनी त्यांची पत्नी आरोपी कल्पनाला विचारले. त्यावेळी आरोपी कल्पनाने किचनमधल्या उलथण्याने फिर्यादी पती कृष्णा यांना मारहाण केली. आरोपी मुलगा अजय याने एका हाताने गळा दाबून फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच आरोपी मुलगी काजलने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.