पत्नी हत्येचा आरोपाखाली पती अडकला, जमीन विकली; १ वर्षांनी तीच पत्नी जिवंत सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 05:14 PM2022-09-04T17:14:45+5:302022-09-04T17:14:55+5:30
१ वर्षापूर्वी बालैनी परिसरातील सोरखा गावातील काळूराम यांनी मे २०२१ मध्ये बहीण पूजाच्या हत्येच्या आरोपाखाली जावई बिजेंद्र यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
उत्तर प्रदेशातील बागपत येथे १ वर्षापूर्वी ज्या महिलेच्या हत्येच्या खटल्यात माहेरच्या लोकांनी पतीविरोधात बालैनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु हीच महिला गाझियाबादच्या लोनी परिसरात प्रियकरासोबत राहत असल्याचं आढळलं आहे. कोर्ट मॅरेज करून महिला प्रियकरासोबत संसार थाटत होती. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
१ वर्षापूर्वी बालैनी परिसरातील सोरखा गावातील काळूराम यांनी मे २०२१ मध्ये बहीण पूजाच्या हत्येच्या आरोपाखाली जावई बिजेंद्र यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिलेचा पती बिजेंद्रनं अटकेविरोधात कोर्टाकडून स्टे आणला. ब्रिजेशनं पोलिसांसह मिळून पूजाच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. या शोधात ढिकौली येथील प्रियकरासोबत कोर्ट मॅरेज करून लोनी इथं राहत असल्याचं कळालं. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले.
या घटनेबाबत पोलीस निरीक्षक भूपेंद्र सिंह म्हणाले की, पूजाचं लग्न १२ वर्षापूर्वी बिजेंद्रसोबत झाले होते. या महिलेला ३ मुले होती. बेपत्ता झाल्यानंतर लोनी इथं या महिलेने चौथ्या मुलाला जन्म दिला. सध्या पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. महिलेचा प्रियकर एका गुन्ह्याखाली सध्या जेलमध्ये बंद आहे असं पोलिसांनी सांगितले.
कोर्टाच्या फेऱ्यामुळे बिजेंद्रनं ३ एकर जमीन विकली
बालैनी रहिवासी बिजेंद्र वाहन चालक आहे. पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु हायकोर्टाने त्याला स्टे दिला. मात्र कोर्टाच्या फेऱ्यामुळे आतापर्यंत ३ एकर जमीन त्याला विकावी लागली.