पत्नीच्या मृत्यूनंतर पतीची आत्महत्या, २२ दिवसांच्या बाळाचे छत्र हरपले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 06:14 AM2021-11-19T06:14:25+5:302021-11-19T06:14:58+5:30
२२ दिवसांच्या बाळाचे छत्र हरपले
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : तालुक्यातील ओझर (कुंडाचापाडा) येथील १८ वर्षीय पुष्पा शैलेश पारधी हिचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असताना, गरिबीला कंटाळून व लहानग्या बाळाचे संगोपन कसे करायचे, या विवंचनेत मृत पुष्पाचा पती शैलेश (वय २६) याने बुधवारी घराशेजारील झाडाला गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पुष्पाला प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे तिची प्रकृती बिघडत गेली. तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथून मुंबईला आणून मोठ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, २२ ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेचा शैलेशला धक्का बसला. आधीच मजुरी करून गरिबीच्या परिस्थितीत गुजराण करत होता. त्यात लहान बाळाचे संगोपन कसे करायचे, असा गंभीर प्रश्न शैलेशला पडला. अवघ्या २२ दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच शैलेशने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
बाळाचा जन्म होताच आईचे छत्र हरपले, तर अवघ्या २२ दिवसात बापाने गळफास घेतल्यामुळे बापाचे छत्र हरपले. अवघ्या २२ दिवसांच्या बाळाने आई-वडिलांना गमावले आहे. शैलेशचे वडीलही मागील तीन वर्षांपासून क्षयाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत बाळाचे संगोपन कोण करणार, अशी समस्या सध्या गावकऱ्यांना सतावत आहे.