नशामुक्ती केंद्रात न जाता पतीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 01:57 AM2020-06-16T01:57:33+5:302020-06-16T01:57:39+5:30
गोरेगावची घटना, सूचनेचा आला राग
मुंबई : दारूचे व्यसन सोडविण्यासाठी पत्नीने नवऱ्याला नशामुक्ती केंद्रात पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र याचा राग आल्याने पतीने गळफास घेत आयुष्यच संपविले. गोरेगाव परिसरात हा प्रकार घडला असून याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
गोरेगाव पूर्वच्या संतोषनगर परिसरात अनिल पवार (४२) हे पत्नी, एक मुलगा आणि दोन मुलींसह राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याने नशामुक्ती केंद्रात जाण्यास पत्नीने सांगितले. तेथे जाण्यासाठी त्यांची समजूत काढू लागल्या. मात्र पवार यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे त्यांच्यात वाद व्हायचे.
अखेर याच वादातून शुक्रवारी पत्नी आणि मुले घरी नसताना त्यांनी गळफास घेतला. त्यांनी एखादी सुसाईड नोट लिहिली आहे का याबाबत दिंडोशी पोलीस शोध घेत असून नशामुक्ती केंद्रात जाण्यासाठी असलेल्या विरोधातच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय आहे.