नवऱ्याला आतेभावाच्या मदतीने संपविले; औरंगाबाद गुन्हेशाखेने २४ तासात केला उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 06:07 PM2018-07-25T18:07:52+5:302018-07-25T18:15:30+5:30
दारूच्या नशेत सतत मारहाण करणाऱ्या नवऱ्याचा आतेभावाच्या मदतीने पत्नीने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
औरंगाबाद : दारूच्या नशेत सतत मारहाण करणाऱ्या नवऱ्याचा आतेभावाच्या मदतीने पत्नीने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या खून प्रकरणी गुन्हेशाखेने गळा चिरणाऱ्या आरोपीसह मृताच्या पत्नीला अटक केली.
धर्मा प्रताप जाधव(रा. राजूर, ता.भोकरदन,जि.जालना, ह.मु.पुंडलिकनगर) आणि ज्योती चव्हाण अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संतोष जानू चव्हाण(२५,मूळ रा.धोपटेश्वर, ह.मु. सातारा परिसर)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले की, बीड बायपास रस्त्यावरील रेणुकामाता मंदीर कमानीजवळ २३ जुलै रोजी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गळा चिरून खून केलेल्या अवस्थेत आढळला होता.
घटनेनंतर पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक राहुल सुर्यतळ आणि कर्मचाऱ्यांनी मृताचा चेहरा स्वच्छ करून त्याचे छायाचित्रे काढून ते सातारा परिसरातील विविध लोकांना दाखविले. त्यावेळी मृत हा संतोष चव्हाण असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांचे पथक संतोषच्या घरी गेले. मृताची पत्नी आणि अन्य नातेवाईकांची त्यांनी विचारपुस केली. त्यावेळी बोलताना मृताची पत्नी ज्योती हीने ती मोबाईल वापरत नसल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. मात्र ती खोटी बोलत असल्याचा संशय पोलिसांना आल्याने तिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या ज्योतीने पती संतोष हा दारूच्या नशेत सतत त्रास देत होता.या त्रासाची माहिती तिने तिचा आतेभाऊ धर्मा जाधव याला दिली. महिनाभरापूर्वी धर्मा आणि तिने संतोषला संपविण्याचा कट रचल्याचे सांगितले.