धर्म बदलण्यासाठी पतीने जबरदस्तीने खायला लावले गोमांस, महिलेची गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 04:02 PM2021-09-02T16:02:43+5:302021-09-02T16:03:34+5:30
Crime News: एका २१ वर्षीय महिलेने तिच्या पतीवर विवाहासाठी जबरदस्तीने धर्म परिवर्तन करावयास लावल्याचा तसेच अनैसर्गिक पद्धतीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.
रायपूर - छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाईमध्ये एका २१ वर्षीय महिलेने तिच्या पतीवर विवाहासाठी जबरदस्तीने धर्म परिवर्तन करावयास लावल्याचा तसेच अनैसर्गिक पद्धतीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. भिलाईमधील छावनी पोलीस ठाण्यात पीडित महिलेकडून याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये महिलेने सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
या महिलेने आरोप केला की, हिंदू धर्म बदलून मुस्लिम होण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. एवढेच नाही तर तिला जबरदस्तीने गोमांसही खाण्यास भाग पाडले गेले. महिलेने केलेल्या तक्रारीवर प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे.
छावणी पोलीस ठाण्यातील प्रभारी विशाल सोन यांनी सांगितले की, या महिलेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारावर तिचा पती आणि त्याचे आई-वडील, भाऊ आणि वहिनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगितले की, महिलेचा पती, तिचे वडील आणि भावाला अटक करण्यात आली आहे. तर पतीची आई आणि वहिनी फरार आहे.
दुर्ग जिल्ह्यातील छावनी परिसरातील जेपी नगर येथे राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत सांगितले की, तिचे त्याच भागात राहणाऱ्या एका व्यक्तीशी संबंध होते. दरम्यान, ही महिला आणि सदर पुरुष कुणालाही न सांगता घरातून फरार झाले होते. त्यानंतर आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, हे दोघेही परत आले. तसेच त्यांनी कोलकातामध्ये विवाह केल्याचे छावणी पोलिसांना सांगितले. तसेच त्यासंबंधीची कागदपत्रेही सुपूर्द केली. तेव्हापासून ही महिला सासरी राहत होती. दरम्यान, आता तिने पती आणि कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच कोलकाता येथे विवाहाआधी तिचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आले. तिच्यावर गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. तसेच तिच्यासोबत अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यात आले, असे आरोप केले आहेत.