तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पती संतापला; पत्नीला घरातून हाकलून देत दिला ट्रिपल तलाक अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 07:14 PM2023-10-20T19:14:07+5:302023-10-20T19:14:52+5:30
तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला घराबाहेर हाकलून दिलं. तसेच हुंड्याची मागणी करून पत्नीला जीवे मारण्याची धमकीही दिली.
उत्तर प्रदेशातील बांदा येथे ट्रीपल तलाकची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला घराबाहेर हाकलून दिलं. तसेच हुंड्याची मागणी करून पत्नीला जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर पतीने तीन वेळा 'तलाक तलाक तलाक' म्हणत महिलेला घराबाहेर काढले. याप्रकरणी महिलेने नाराजी व्यक्त करत पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी सासरच्या आठ लोकांविरुद्ध हुंडाबळी, ट्रिपल तलाक, मारहाण आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हे प्रकरण पैलाणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. जहां येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने पोलिसांना सांगितलं की, 2014 मध्ये फतेहपूर जिल्ह्यात तिचं लग्न झालं होतं. लग्नानंतर लगेचच सासरचे लोक हुंड्यामुळे खूश नव्हते. हुंड्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जातो. त्यामुळे ती अनेकदा आई-वडिलांच्या घरी राहून मुलांचे संगोपन करण्यासाठी मजुरीचे काम करते.
महिलेच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. तिला तीन मुली आहेत. महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा तिसरी मुलगी झाली तेव्हा तिचा पती आणि इतर सासरचे लोक खूप संतापले. जीवे मारण्याची धमकी देत घरातून हाकलून दिले. पती एक लाख रुपये हुंडा आणा, अन्यथा मी तलाक देईन, असे सांगू लागला. नातेवाईकांसोबत अनेकदा चर्चा झाली पण काहीच निष्पन्न झालं नाही. शेवटी संतापलेल्या पतीने फोनवर ट्रिपल तलाक दिला.
महिला तिच्या तीन मुलींसह न्यायाच्या शोधात आहे. पोलिसांकडे तक्रार करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस स्टेशनचे प्रभारी अनिल कुमार यांनी आजतकला सांगितले की, पोलीस स्टेशन परिसरातील एका महिलेने सासरच्यांकडून छळ आणि तलाकची तक्रार केली आहे. तक्रारीच्या आधारे तातडीने दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.