पत्नीकडून पीएम मोदी आणि सीएम योगींचे समर्थन, पतीने दिला तिहेरी तलाक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 07:20 PM2022-07-29T19:20:34+5:302022-07-29T19:21:19+5:30
Crime News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केल्यामुळे पतीने तिहेरी तलाक देऊन घरातून हाकलून दिल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
मुरादाबाद : सरकारने तिहेरी तलाक आधीच बेकायदेशीर घोषित केला आहे. असे असताना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरात तिहेरी तलाक देण्याचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केल्यामुळे पतीने तिहेरी तलाक देऊन घरातून हाकलून दिल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर एसएसपींनी कोतवाली पोलीस ठाण्याला या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुरादाबादच्या कोतवाली ठाण्यात राहणाऱ्या शना इरमने सांगितले की, डिसेंबर 2019 मध्ये तिचे मोहम्मद नदीमसोबत लग्न झाले होते. ती कोतवालीच्या पिरजादा भागातील रहिवासी आहे.
पीडितेने सांगितले की, लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी छळ करण्यास सुरूवात केली. याचे मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) आणि पंतप्रधान (नरेंद्र मोदी) यांचे समर्थन. या कारणावरून सासरचे लोक तिचा छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने 3 मार्च रोजी एफआयआर दाखल केली आहे. यानुसार आता पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी एसपी सिटी अखिलेश भदौरिया यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने पती आणि सासरच्या मंडळींवर आरोप केले आहेत. या विशिष्ट प्रकरणात कलम 376 आणि 511 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.