संपत्तीसाठी २० लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या, पत्नीसह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 01:30 PM2023-05-19T13:30:37+5:302023-05-19T13:31:57+5:30
कळंबोली सेक्टर ६ येथील उद्यानात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जसपाल निस्तर सिंग खोसा (४८) यांचा मृतदेह आढळला होता. या हत्येचा उलगडा करून गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांची पत्नी व इतर दोघांना अटक केली.
नवी मुंबई : पैशांसाठी नेहमी कटकट करून वाद घालणाऱ्या व्यावसायिकाची त्याच्या पत्नीने २० लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी पत्नीसह तिघांना अटक केली. आरोपी तिच्या माहेरातील परिचयातील आहेत. पतीच्या निधनानंतर संपत्ती व खात्यातील रक्कम आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगून तिने हत्येचा कट रचला होता.
कळंबोली सेक्टर ६ येथील उद्यानात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जसपाल निस्तर सिंग खोसा (४८) यांचा मृतदेह आढळला होता. या हत्येचा उलगडा करून गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांची पत्नी व इतर दोघांना अटक केली.
पती-पत्नीत सतत सुरू हाेता वाद
गुन्हे शाखा कक्ष २चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक निरीक्षक प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड, उपनिरीक्षक वैभवकुमार रोंगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. हत्येनंतर दोघा संशयितांची माहिती मिळाली होती. त्यावरून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिल्लीला जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी जसपाल यांची पत्नी दलजित खोसा (३८) हिच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार तिघांनाही अटक केली आहे. पत्नी दलजित हिचे वागणे व इतर कारणांनी जसपाल यांनी तिला पैसे देण्याचे थांबवले होते. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद सुरू होता.
पंजाबमध्ये माहेरी रचला हत्येचा कट
दलजित पंजाबमधील माहेरी गेली असता तिथे तिने सुखजिंदर सिंग (२३) व एकम ओनकार सिंग (२९) यांच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला होता. पतीची हत्या केल्यास २० लाख रुपये व पतीच्याच ट्रान्सपोर्ट व्यवसायात नोकरीदेखील देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दोघेजण कळंबोली सेक्टर ६ येथील उद्यानात येऊन थांबले होते. त्याचवेळी दलजित हिने घरातील कुत्र्याला फिरून आणण्याच्या बहाण्याने पतीला तिथे पाठवले असता दोघांनी चाकूने वार करून पळ काढला होता.
स्वतःच्या मुलालाही दिली धमकी
पतीच्या हत्येप्रकरणी दलजित हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्या दोनपैकी एका मुलाने केलेल्या कृत्याबद्दल जाब विचारला. यावेळी तिने ‘नशीब समज, तू वाचलास’ अशी धमकी दिल्याचे समजते. यावरून वेळ पडल्यास ती स्वतःच्या मुलांच्या हत्येच्या तयारीत होती का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.