आजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या करुन पतीने घेतला गळफास; कर्वेनगरमधील घटनेने पुण्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 11:42 AM2020-07-29T11:42:09+5:302020-07-29T11:51:04+5:30
अनेकदा फोन करून देखील संपर्क होत नसल्याने आला संशय
पुणे : आजारपणाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिचा खुन केला व त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
अविनाश हेमंत गोरे (वय ६९) आणि वैशाली हेमंत गोरे (दोघे रा. गंगा विष्णु संकुल, कर्वेनगर) अशी या ज्येष्ठ नागरिकांची नावे आहेत़
याबाबत मिळालेली माहिती अशी, अविनाश गोरे हे एल आय सीमध्ये स्टेनो ग्राफर होते. त्यांना एक कन्या असून ती विवाहित आहे. त्या सिंहगड रोडला राहायला आहेत.त्यामुळे कर्वेनगरमध्ये ते दोघेच पती पत्नी राहत होते. वैशाली गोरे यांना वयोमानानुसार अनेक व्याधी झाल्या होत्या. अविनाश गोरे यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या मित्रांना आपले गुडघे खुप दुखत असल्याचे भेटल्यावर सांगितले होते.ते आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी फोनवरुन संपर्कात होते. या आजाराला कंटाळून त्यांनी आपली पत्नी वैशाली हिचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर स्वत: ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनेकदा संपर्क करुनही ते फोन उचलत नसल्याने अलंकार पोलिसांना २७ जुलै रोजी दुपारी याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घरी जाऊन पाहिले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे यांनी फिर्याद दिली आहे.