सव्वा लाखाची सुपारी देऊन पतीनेच केली पत्नीची हत्या; कारण ऐकून पोलिसांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 04:05 PM2021-11-17T16:05:57+5:302021-11-17T16:06:22+5:30
कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांना गँगस्टर गौतम कुमार, संजीव कुमार यांच्याशी संवाद झाल्याचं आढळलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापेमारी करत गौतम आणि संजीवला ताब्यात घेतलं.
मुंगेर – बिहारच्या मुंगेर इथं १५ नोव्हेंबरला झालेल्या दीपिका शर्मा नावाच्या महिलेच्या हत्याकांडाचा खुलासा पोलिसांनी ३६ तासांत पूर्ण केला आहे. या महिलेच्या हत्येचं षडयंत्र रचणाऱ्यांमध्ये तिच्या पतीचाही समावेश होता. पोलिसांनी पतीसह इतर ५ आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिसांनी जेव्हा हत्या कुठल्या हेतूने करण्यात आली असा प्रश्न आरोपी पतीला केला तेव्हा त्याच्या उत्तराने पोलिसांना धक्काच बसला.
याबाबत पोलीस अधीक्षक जगुनाथरेड्डी जलारेड्डी यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी दीपिका शर्मा नावाच्या महिलेची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. या महिलेचा भाऊ कुमार भानु याने त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरुवात केली तेव्हा महिलेच्या सासरकडच्या मंडळींवर संशयाची सुई आली. मृत महिलेचा दीर छोटू शर्मा, सासरे राजीव कुमार, चुलत दीर सुमित कुमार यांचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा हत्येच्या दिवशी हे तिघंही घरात असल्याचं कळालं.
कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांना गँगस्टर गौतम कुमार, संजीव कुमार यांच्याशी संवाद झाल्याचं आढळलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापेमारी करत गौतम आणि संजीवला ताब्यात घेतलं. या दोघांची चौकशी केली असता पोलिसांसमोर त्यांना हत्येची कबुली दिली. आरोपी गौतम कुमार म्हणाला की, सुमित कुमारनं जवळपास १ महिन्यापूर्वी फोन करुन सांगितले होते की, माझा भाऊ रवी कुमार जो सीआयएसएफमध्ये कार्यरत आहे. तो त्याच्या पत्नीची हत्या करु इच्छितो. त्याबदल्यात १ लाख २० हजार रुपये तुम्हाला मिळतील. सुमितनं त्याच्या मोबाईलवरुनच रवी कुमारशी संवाद साधला होता आणि आगाऊ रक्कम म्हणून २० हजार गौतमला दिले होते.
२०१७ मध्ये दीपिका शर्माच्या माहेरी गोळीबारीची घटना घडली होती. त्यावेळी दीपिका ७ महिन्याची गर्भवती होती. त्या घटनेत गोळीबारीत मृत दिपिकाच्या आईचा मृत्यू झाला होता. तर दीपिकालाही २ गोळ्या लागल्या होत्या. एक गोळी तिच्या उजव्या हातात लागली होती. त्यामुळे त्या हाताने तिला काहीच काम करता येत नव्हतं. त्यामुळे मृत दीपिकाला सासरचे लोक नापसंत करु लागले होते. त्यानंतर एकेदिवशी नाराज पती आणि सासरच्या माणसांनी दीपिकाच्या हत्येचा कट रचला. सोमवारी जेव्हा दीपिका टॉयलेटला गेली होती. तेव्हा आरोपी शूटर घरात घुसले आणि दीपिकावर गोळीबारी सुरु केली. या घटनेत आरोपी पती, त्याचे दोन भाऊ आणि २ शूटरना अटक केली आहे तर आणखी एक फरार आहे.