पत्नीला जिवंत पेटवून देऊन हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 08:29 PM2021-03-10T20:29:37+5:302021-03-10T20:30:13+5:30
Crime News : या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी केला.
गडचिरोली : क्षुल्लक कारणातून पत्नीशी झालेल्या भांडणानंतर अंगावर रॉकेल टाकून तिला जीवंत पेटवून मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एन.मेहरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुनील उत्तम बारसागडे (३८) रा.कुरखेडा असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी सुनीलचे १९ एप्रिल २००८ रोजी लग्न झाले होते. पत्नी सरिता हिच्यापासून त्याला दोन मुलेही झाली. यादरम्यान २५ जुलै २०१७ रोजी सरिता आपले माहेर ब्रह्मपुरी येथून वास्तपुजनाचा कार्यक्रम आटोपून कुरखेडा येथे आल्यानंतर सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास सर्वजण घरात जेवण करीत होते. त्यावेळी पती-पत्नीत भांडण झाले. त्यामुळे पत्नी सरिता हिने आता मी तुझ्याजवळ राहात नाही असे म्हणत आरोपीची फिरकी घेतली. पण त्यामुळे सुनीलचा पारा जास्तच गरम झाला. त्याने थेट रॉकेल घेऊन सरिताच्या अंगावर टाकले आणि तिला पेटवून दिले. ८० टक्के जळालेल्या अवस्थेत सरिताला शेजारच्या लोकांनी कुरखेडाच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान १ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोपी सुनीलवर आधी कलम ४९८ (अ), ३०७ आणि नंतर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सरिताचे मृत्यूपूर्व बयाण आणि साक्षीदारांचे बयाण व पुराव्याच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधिश मेहरे यांनी सुनील बारसागडे याला आजन्म कारावास आणि ३००० रुपये दंड अशी शिक्षा बुधवारी (दि.१०) सुनावली.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी केला. सरकारी पक्षातर्फे न्यायालयात ॲड.अनिल एस.प्रधान यांनी बाजू मांडली तर कोर्ट पैरवी उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांनी केली.